सावंतवाडी : नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी केली.नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मंगळवारी येथील केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी दळवी, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.
लोबो यांनी मासिक बैठकीच्या अजेंड्यावरून परब यांच्यावर टीका केली. शासनाचा अध्यादेश आहे. बैठका आॅनलाईन पद्धतीने घ्या, असे असताना परब यांनी आॅफलाईन बैठक कशी काय घेतली. मुख्याधिकारी यांचीही चूक आहे. फक्त दिशाभूल करणारे कागद दाखवायचे एवढेच काम परब करीत आहेत. पण आता जनता हुशार आहे. जे नगरसेवक बैठकीला आले नाहीत त्यांना पक्ष व्हीप काढेल. त्यांनी त्यांची उत्तरे पक्षाकडे द्यावीत. त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही लोबो यांनी यावेळी सांगितले.ते स्टॉल काढण्याचे पत्र कोणी दिले ?आमची पत्रे सगळ्यांना दाखवता पण आम्ही स्टॉल हटावाबाबत कुठलेही पत्र दिले नाही. उलट नवीन स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याची कारणे शोधावी लागतील. ते स्टॉल काढा अशीच आमची भूमिका आहे, असे लोबो यांनी सांगितले. मात्र, आमची पत्रे पुढे करता मग गवळी तिठ्यावरचे स्टॉल काढण्यासाठीचे पत्र कोणी दिले याची माहिती सर्व जनतेला आहे. जे आपले अधिकार नाही ते अधिकार वापरायला बघता का? असा सवालही यावेळी लोबो यांनी केला. गवळी तिठ्यावरच्या टपऱ्या काढण्यासाठी कोणी पत्र दिले? असे सांगत त्यांनी ते पत्र पत्रकारांना दाखविले.