सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाके सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाके पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.मनुष्यबळ नाही, असे कारण पुढे करून जिल्ह्याच्या सीमेवरचे तसेच समुद्राच्या काठी असलेले नाके बंद केले, असे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी आपल्याला सांगितले. मात्र याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विचार करावी, अशी मागणी आपण केली आहे, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब अशोक सावंत आदी उपस्थित होते राणे पुढे म्हणाले, गेल्या महिन्यात जिल्ह्यातील नाकी अचानक बंद करण्याचा निर्णय गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र हा त्यांचा निर्णय चुकीचा आहे सद्यस्थितीत राज्यात दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे, अशा परिस्थितीत एखाद्या दहशतवादी या ठिकाणी आल्यास त्याला तपासणार कसे किंवा ओळखणार कसे, असा प्रश्न यावेळी राणे यांनी उपस्थित केला. आपण याबाबत पोलीस अधीक्षकांची चर्चा केली आहे. त्यामुळे आता गृहखात्याने योग्य ती दखल घेऊन निर्णय घ्यावा, असे राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील तपासणी नाके सरसकट बंद करणे चुकीचे : नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:47 PM