सावंतवाडी : सावंतवाडी शहरात कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात टेम्पो येत आहेत. त्यामुळे येथील टेम्पो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सावंतवाडीत सुमारे चाळीस मिनी टेम्पोधारक आहेत. यावर प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यावा. अन्यथा टेम्पो चालक कामबंद आंदोलन करतील, असा इशारा सावंतवाडी शहरातील टेम्पोचालकांनी दिला आहे. याबाबत मंगळवारी येथील मोती तलावाच्या काठावर टेम्पो चालकांनी चर्चा करून निर्णय घेतला आहे.गेले काही महिने कर्नाटकातील मुकादम आपले टेम्पो व कामगार घेऊन येत असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकतर त्यांना तत्काळ येथून घालवा. अन्यथा आम्ही सर्व टेम्पोचालक कामबंद आंदोलन करू, असा इशारा सावंतवाडी शहरातील टेम्पोचालकांनी दिला आहे. सावंतवाडीतील बिल्डर, ठेकेदार, बाहेरील मुकादम हे टेम्पो येथे आणतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.मुकादम जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक, डंपर हे सर्व सामान घेऊन सावंतवाडीत आपले बस्तान मांडत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे वेळीच न थांबल्यास सावंतवाडी शहरातील सर्व टेम्पोचालक कामबंद आंदोलन छेडतील, असा इशारा सुनील प्रभू-केळुसकर, अजय जाधव, सतीश नार्वेकर यांनी दिला आहे.
यावेळी विशाल सावंंत, अनंत तुडयेकर, जमीर शेख, बेटा नार्वेकर, नितीन सुभेदार,उमेश दापले, अस्लम बेग, समीर बेग, उमेश सावंत आदी उपस्थित होते.