शिरगाव : कोकणच्या लाल मातीतून पुढे आलेल्या कबड्डीने जगातील ३५ देशांत लोकप्रियता मिळवली, ४५ कोटी देशवासीयांनी प्रोकबड्डी क्रीडा स्पर्धा पाहिल्या आहेत. येत्या मे महिन्यापासून अधिकाधिक खेळाडूंना संधी मिळण्यासाठी महाकबड्डीचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा चिपळुणातील प्रोकबड्डी बक्षीस वितरणप्रसंगी १९८० अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी केली. मला आजही मैदानात खेळावे वाटले, असे संयोजन जिमखाना स्पोर्टस् क्लबने केल्याचे सांगून सचिन कदम क्रीडारसिकांच्या मनात १०० पावले पुढे गेल्याचे आपल्या भाषणातून सांगितले.अंतिम सामन्यात नम्रता प्रतिष्ठान, मंडणगडचा, चिपळूण संघाने तब्बल २१ गुणांनी पराभव केला. उपविजेता संघातून कुलभूषण कुलकर्णी, नितीन कुंभार, सौरभ तटकरे यांची अन्य स्पर्धेतील कामगिरी यावेळी दिसली नाही तर स्वप्नील शिंदे, सतीश खांबे, अभिषेक भोजने यांनी लक्षवेधी कामगिरी दाखवत संघाला यश मिळवून दिले. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या शाहू (सजेली) कोल्हापूर संघातील महेश मगदूम याने क्रीडा रसिकांकडून वाहवा मिळवली. संघाने मिळवलेला २६ गुणांपैकी आठ गुण त्याचे एकट्याचे होते. काही काळ आक्रमक झालेल्या कोल्हापूर संंघातील खेळाडूंना दोनवेळा ग्रीन व एकदा रेड कार्ड दाखवत पंचांनी सामन्यावर नियंत्रण ठेवले. भैरवनाथ पुणे संघाला या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळाला तर वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू चिपळूणचा अभिषेक भोजने, उत्कृष्ट पकड मंडणगडच्या कुलभूषण कुलकर्णी तर उत्कृष्ट चढाईचे बक्षीस कोल्हापूरच्या महेश मगदूमला देण्यात आले.१९३५ नंतर चिपळूणवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिलेली ही दुसरी कबड्डी स्पर्धा यशस्वी झाली आहे. क्रीडा प्रेमींना या क्रीडा संकुलात बसून योग्यप्रकारे खेळ पाहता आल्याचे समाधान आहे. यापुढील स्पर्धेला आपले सहकार्य राहील, असे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष रमेश कदम यांनी सांगितले. उरणच्या कलाकारांनी दोनवेळा नृत्याविष्कार सादर केल्याने मधल्या वेळेतही चैतन्य टिकवण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी पुणेरी फलटणचे कैलास कानपाल, आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, अर्जुन अॅवार्ड मानकरी व पुणेरी फलटणचे प्रशिक्षक अशोक शिंदे, सुधीर शिंदे, शेखर निकम, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, प्रताप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)
चिपळुणमध्ये आता महाकबड्डी भरवणार : जाधव
By admin | Published: February 10, 2015 10:54 PM