मालवण : आचरा बंदर येथे घडलेल्या राडा प्रकरणानंतर पारंपरिक मच्छिमारांवरील पोलिसांच्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या ‘जेल भरो’ आंदोलनाचा ‘फुसका बार’ उडाला. जेल भरो आंदोलनासाठी अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाचे इशारे देणारे प्रमुख संशयित भूमिगत असल्याने ‘जेल भरो’साठी जमलेल्या पारंपरिक मच्छिमारात आंदोलनाच्या रूपरेषेविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या शिष्टाईनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांच्या जमावबंदी नोटिसीनंतर मोठ्या संख्येने महिलांसह २०० ते ३०० मच्छिमार दांडी चौकाचार येथे शुक्रवारी सकाळी मंदिरात एकत्र झाले. आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळीही जमा झाली. काही प्रमुख संशयित मच्छिमारांना आम्ही पोलिसांच्या ताब्यात देतो. पोलिसांनी त्यानंतर धरपकड मोहीम थांबवावी, असे स्पष्ट करण्यात आले. सायंकाळी अन्वय प्रभू यांच्यासह पाच संशयित पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर अटक करण्यात आली. (प्रतिनिधी) अटकसत्र सुरूच राहणार मच्छिमारांच्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जेल भरो आंदोलन न झाल्याने सायंकाळी उशिरा पोलीस बंदोबस्त काढण्यात आला. मच्छिमारांनी स्वत:हून अटक करून घेऊ, असे सांगितले आहे. सर्व संशयित मिळेपर्यंत कारवाई सुरु राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी स्पष्ट केले. ढोके यांचा जबाब नोंदवाच पारंपरिक मच्छिमार विजय ढोके यांच्यावर हल्ला करणाऱ्या स्थानिक पर्ससीनधारकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी ढोके यांचा जबाब नोंदवला जावा, एकतर्फी होणारी कारवाई पोलिसांनी यापुढे थांबवावी, अशी आक्रमक भूमिका मच्छिमार व लोकप्रतिनिधींनी घेतली. पोलिसांनी एकतर्फी कारवाई थांबवल्यास सहकार्य करण्यास तयार आहोत, असे स्पष्ट करण्यात आले.
जेल भरोचा ‘फुसका बार’
By admin | Published: November 06, 2015 11:18 PM