जैतापूर : राजापूर तालुक्यातील माडबन येथे होऊ घातलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे जैतापूर परिसर आता कात टाकू लागला आहे. परिसरात वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने जैतापूर ‘हायटेक’ होण्याच्या मार्गावर आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून १६ किलोमीटरच्या परिघात या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.माडबन याठिकाणी कंपनीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पअंतर्गत रस्ते, वीज पुरवठा, फायर स्टेशन, जैविक लॅब, हवामान केंद्र, सिक्युरिटी फोर्स, सुसज्ज कँटिन, रूग्णवाहिका यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पामुळे परिसरातील तरूणांच्या हाताला रोजगार मिळणार असून, स्थानिक पातळीवर विविध संस्था प्रकल्पग्रस्त म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर कंपनीमुळे येथील जमिनीला चांगला दर लाभत आहे. अनेकांनी आपापल्या जमिनी विकून त्यातून पैसा मिळवला आहे. याठिकाणी मजुरांची संख्या धरून सुमारे ४२ हजार लोकवस्ती होणार आहे. जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे या परिसराचे रूपडे पालटून जाणार आहे. स्थानिक पातळीवर सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच येथील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला होणारा विरोध मोडीत काढण्यासाठी अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रकल्पास्थळी माहिती केंद्र सुरू करण्याची गरज आहे. (वार्ताहर)प्रकल्पामुळे येथील बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या हे गाव सधन होणार आहे. मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. कंपनीसाठी आवश्यक असणाऱ्या गार्डसाठी येथील तरूणांना सिक्युरिटी गार्डच्या ट्रेनिंगसाठी कंपनीमार्फत पाठवण्यात आले आहे.मिठगवाणे तिठा याठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प अधिकारी व कर्मचारी वसाहत बांधण्यात येणार आहे. त्याठिकाणी ३५०० कुटुंब राहणार आहेत. त्याशिवाय शाळा, कॉलेज, पेट्रोलपंप, आयटीआय, अद्ययावत दवाखाने, एस. टी. आगार, ट्रान्सपोर्ट यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.माल वाहतुकीच्या दृष्टीने जैतापूर प्रकल्पस्थळापर्यंत रेल्वे मार्गाचेदेखील सर्वेक्षण करण्यात आले आहे. याठिकाणी रेल्वे मार्ग सुरू झाल्यास परिसरातील ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे.
प्रकल्पामुळे जैतापूर ‘हायटेक’च्या उंबरठ्यावर
By admin | Published: November 13, 2015 9:00 PM