सावंतवाडी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात पाणी पोहोचविण्याचा मानस असूनही याबाबत सावंतवाडी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. याविषयी खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, ते सुद्धा परिपूर्ण नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर प्रस्ताव द्या अन्यथा आपल्या गावात योजना नको असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांच्या सहीनिशी द्या, असे अध्यक्ष सावंत यांनी यावेळी सांगितले. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांची ऑनलाईन बैठक झाली.यावेळी झालेल्या चर्चेत हा प्रकार उघड झाला. अडीच महिन्यांपूर्वी याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ग्रामसेवक व सरपंचांना देऊनही ६३ पैकी केवळ १८ प्रस्ताव प्राप्त झाल्याने या योजनेबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी पोहोचविण्याचा प्रशासनाचा मानस असून, त्याला अपेक्षित सहकार्य संबंधितांकडून मिळत नाही. त्यामुळे या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी विशेषत: सरपंचांनी गाव प्रतिनिधी म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन संजना सावंत यांनी केले.केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना ही पाणीटंचाई निवारण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या योजनेबाबतची माहिती प्रत्येक गावागावातील सरपंचांना होणे आवश्यक आहे. ती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे....अन्यथा योजना नको असल्याचे पत्र द्याया बैठकीत झालेल्या चर्चेत काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना या योजनेची माहिती नसल्याचे उघड झाले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची पुन्हा बैठक घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर प्रस्ताव देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यवाही करावी अन्यथा आपल्याला योजना नको असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांच्या सहीनिशी सादर करावे, असे अध्यक्षा सावंत यांनी सांगितले.