कुडाळ : जांभवडे गावातील बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी व नवीन लँडलाईन जोडण्या तत्काळ पूर्ण व्हाव्यात यासह इतर मागण्यांसाठी जांभवडे येथील ग्रामस्थांनी कुडाळच्या बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, जांभवडे येथे बीएसएनएलचा टॉवर आहे. पण या गावातील भगवती मंदिराच्या पलिकडे या टॉवरचे नेटवर्क मिळत नाही. तसेच दूरध्वनीही लागत नाहीत. त्यामुळे येथील मोबाईलधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे येथे लँडलाईन सेवा मिळण्याकरिता येथील ग्रामस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता बीएसएनएलकडे केली आहे. तरीही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या विभागाच्या कारभाराविरोधात उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी जांभवडे येथे गेले होते. मात्र, कोणतीच सुधारणा झाली नाही, असाही आरोप येथील ग्रामस्थांनी करीत सोमवारी कुडाळ येथील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, आबा मुंज, उपसरपंच चिंतामणी मडव, डॉ. प्रशांत मडव, अॅड. विशाल मडव, बाळकृष्ण मडव, अजिंक्य जांभवडेकर, कृष्णा पेडणेकर, अमित मडव, अक्षय माळकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी उपोषणककर्त्यांची भेट घेतली (प्रतिनिधी) तीन आठवड्यात योग्य निर्णय घ्या उपोषणकर्त्यांना अधिकाऱ्यांनी भेट देत चर्चा केली. यावेळी त्यांनी जीपीआरएस व नेटवर्कचे प्रश्न तत्काळ सुटावेत, अशी मागणी केली. तसेच ग्राहकांचा संतापही आपल्या कारभाराने वाढत असल्याचे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी तीन आठवड्यात येथील दूरध्वनी सेवांबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करून योग्य सुविधा पुरवा, असे सांगत उपोषण स्थगित केले.
जांभवडे ग्रामस्थांचे उपोषण
By admin | Published: October 18, 2016 12:35 AM