संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : मालवणची सुकन्या असलेल्या जान्हवी अभिजित देवधर (वय २३, रा. बोरिवली, मुंबई) हिने भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये सर्वांत तरुण महिला स्कुबा डायव्हिंग कोर्स संचालक, बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तिचे असामान्य कौशल्य महत्त्वाकांक्षी महिला गोताखोर आणि प्रशिक्षकांसाठी प्रेरणेचा किरण ठरले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर मानांकित आणि स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षकांची व्यावसायिक संघटना असलेल्या ‘पॅडी’ या संस्थेत कोर्स डायरेक्टर होण्याचा जान्हवीचा प्रवास वयाच्या १६ व्या वर्षी तिचे मूळ गाव असलेल्या मालवण येथून सुरू झाला. तिची जिज्ञासा आणि समुद्रात खोलवर जाण्याच्या इच्छेमुळे, तिने तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्टस् (इसदा)मधून स्कुबा डायव्हिंग प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी कठोर प्रशिक्षण सुरू केले. जान्हवीने वयाच्या २० व्या वर्षी भारतातील सर्वांत तरुण ‘पॅडी’ महिला विशेष प्रशिक्षकांपैकी एक म्हणून पहिला टप्पा गाठला.पुढील टप्प्याचे प्रशिक्षण तिने दुबईमधून पूर्ण केले. जान्हवी सर्वांत तरुण आणि पहिली महिला भारतीय ‘पॅडी’ कोर्स डायरेक्टर म्हणून, स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण आणि इतर व्यक्तींना प्रमाणित करण्यासाठी सक्षमतेने तयार आहे.
शिक्षण मुंबईत..सध्या दुबईतजान्हवीचे शिक्षण मुंबईतील सिडनेहॅम कॉलेजमध्ये झाले असून सध्या ती दुबईत आहे. तिची आई कलाकार असून त्यांचा स्वत:चा आर्ट ब्रॅंड आहे. वडील अभिजित देवधर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत.
‘‘समुद्राने मला नेहमीच हाक मारली आहे. त्याची विशालता, त्याचे रहस्य, त्याचे मूक सौंदर्य हे एक आकर्षण होते ज्याचा मी प्रतिकार करू शकत नाही. पाण्याखालील जग आणि तिथल्या अविश्वसनीय अधिवासाने मोहित होऊन मी तरुणपणीच डायव्हिंग करायला सुरुवात केली.’’ - जान्हवी देवधर.