सावंतवाडी : आरोंदा जेटीवरुन काँग्रेस नेते नारायण राणे हे माझ्यावर टीका करतात. पण आरोंदा जेटीला त्यांनीच मंजुरी दिली. मग आताच या जेटीला विरोध का, असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. सरकारचे नुकसान होत असल्याने रेडी बंदराचा करार करण्यास अधिकाऱ्यांनीही विरोध केला होता. मात्र, हा विरोध डावलून राणेंनी करार केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शहरअध्यक्ष आनंद नेवगी, परिणिती वर्तक आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ आदी प्रकल्प होऊ घातले. त्याबद्दल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कधीही प्रकल्प झाले पाहिजेत म्हणून बैठका घेतल्या नाहीत. मात्र, रेडी बंदर व्हावे यासाठी अनेक बैठका घेतल्या. आघाडी सरकारमधील अधिकारीही रेडी बंदर मालक मोठ्या प्रमाणात सरकारचे नुकसान करीत आहे. त्यामुळे करार रद्द करण्यात यावा, या मानसिकतेत होते. मात्र, राणेंनी सर्वांचा विरोध डावलून हा नवीन करार केला आहे. जर रेडी बंदर मालकाने रेडी परिसराचा विकास केला असता, तर आम्ही कधीही विरोध केला नसता. आरोंदा जेटीसाठी रेडी बंदराला विरोध मुळीच करणार नाही, असेही यावेळी तेली यांनी सांगितले. आरोंदा जेटीला नारायण राणे उद्योगमंत्री असताना परवानगी मिळाली होती. मात्र, त्याला आताच विरोध का, असा सवालही त्यांनी केला. तसेच रेडी बंदराचे कंत्राट योग्य काम केले नसल्याने रद्द करण्यात येत आहे. ही भूमिका युती सरकारने घेतली आहे. त्याच्याशी काडीमात्र संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतर प्रकल्प व्हावेत तसेच रेडी बंदर प्रकल्प व्हावा, अशीच आमची इच्छा होती. विकासाला माझा कधीही विरोध नव्हता. रेडी बंदराच्या जनसुनावणीलाही मी हजर होतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) निष्क्रीय पालकमंत्री या भूमिकेवर ठाम : जठार निधी किती आणला यापेक्षा विकास किती झाला याला महत्त्व आहे. त्यामुळे महामार्गावरचे रस्ते खराब झाले आहेत. हा मुद्दा घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, यावेळी पालकमंत्री बदलाचीही मागणी करणार असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. पालकमंत्री निष्क्रीय या भूमिकेवर आजही आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोंदा जेटीला तेव्हा परवानगी मग आता विरोध का?
By admin | Published: October 01, 2016 11:38 PM