वैभववाडी : कट्टर राणेसमर्थक तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी बुधवारी दुपारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. रावराणेंच्या सेना प्रवेशामुळे तालुका काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जयेंद्र रावराणेंच्या शिवसेना प्रवेशावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक आदी नेते उपस्थित होते. गेली २५ वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या रावराणेंची कुशल संघटक आणि प्रशासक म्हणून ओळख आहे. संघटन कौशल्याच्या जोरावरच त्यांनी पुरेसे संख्याबळ नसतानाही जिल्ह्यातील सेनेचा पहिला सभापती वैभववाडी पंचायत समितीमध्ये बसविण्याची किमया १९९३ मध्ये घडविली होती.त्यानंतर तालुकाप्रमुख म्हणून काम करताना रावराणे यांनी १९९७ मध्ये स्वत: निवडून येत पंचायत समितीवर ५ जागांसह पूर्ण बहुमत सिद्ध केले. त्यानंतर २००२ आणि २००७ असे दोनवेळा ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. त्या कालावधीत पंचायत समिती उपसभापती, सभापती, जिल्हा परिषद बांधकाम आणि वित्त समिती अशी चढत्या क्रमाने पदे त्यांनी भूषविली. परंतु पक्षांतर्गत कुरघोड्यांचे ते अलिकडे बळी ठरले होते. पक्षातीलच काही मंडळींनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे रावराणेंच्या बाबतीत गैरसमज पसरविण्याचे काम केले असे ते सातत्याने बोलून दाखवत होते. राणेंच्यासोबत रावराणेही त्यावेळी काँग्रेसमध्ये आले. परंतु ते काँग्रेसमध्ये म्हणावे तेवढे रमले नव्हते. हे त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसून येत होते. रावराणे यांचा तालुक्यात जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळेच स्वत:चे मत नसताना कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघात २००७ मध्ये स्वत: आणि २०१२ मध्ये विद्यमान महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगेंकरवी रावराणेंनी स्थानिक उमेदवाराला पराभूत करून आपले कौशल्य सिद्ध केले. (प्रतिनिधी)मोठा धक्कारावराणे यांचा सेना प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून त्यांचे काही सहकारीही नजीकच्या काळात काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावराणेंच्या सेना प्रवेशामुळे २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे.
जयेंद्र रावराणे शिवसेनेत
By admin | Published: February 04, 2015 9:42 PM