कणकवली : येथील गांगोमंदिरानजीक नळयोजनेची पाईपलाईन शोधण्यासाठी जेसीबीने खोदण्यात येत असताना पाईपलाईनसह दूरसंचारची केबल तुटली. यामुळे कणकवली, जानवली परिसरातील सुमारे एक हजार दूरध्वनी जोडण्या ठप्प झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या बेपर्वा कामाचा फटका नागरिकांना बसला आहे. गांगोमंदिरसमोर एका संकुलात पाण्यासाठी नळजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी नगरपंचायतीकडून पाईपलाईन शोधण्यात येत होती. सुरूवातीला मजूरांकरवी खोदकाम केले जात होते. मात्र, तरीही पाईपलाईन न मिळाल्याने शेवटी जेसीबी लावून खोदाई करण्यात आली. यामुळे पाईप लाईनसह बीएसएनएलची जमिनीखालून जाणारी वाहिनी तुटली. यामुळे कणकवली, जानवली परिसरातील सुमारे हजारभर लोकांचे दूरध्वनी ठप्प झाले असल्याची माहिती दूरसंचारच्या अधिकाऱ्यांनी दिली. कणकवली शहरातील खोदाई करताना जेसीबी न वापरता मजूरांकरवी खोदाई केली जाते. मात्र, हा संकेत न पाळता जेसीबी लावण्याचा आतताईपणाचा नागरिकांना फटका बसला आहे. वैयक्तिक दूरध्वनींसोबत परिसरातील बॅँक आणि एटीएमची आॅनलाईन यंत्रणाही ठप्प झाली आहे. (प्रतिनिधी) नगरपंचायतीला नोटीस पाठविणार वाहिनी तुटलेल्या ठिकाणी पाणी साठले असून साफसफाई करून लाईन जोडून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अजून चार-पाच दिवस जाण्याची शक्यताही बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. नगरपंचायतीच्या कामावर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खोदाई केली जात असल्याबाबत बीएसएनएलला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. झालेल्या नुकसानीबाबत नगरपंचायतीला नोटीस पाठवणार असल्याचे बीएसएनएलकडून स्पष्ट करण्यात आले.
जेसीबीने दूरसंचार वाहिनी तोडली
By admin | Published: January 16, 2016 11:31 PM