कणकवली : शहरानजीक जानवली, आदर्शनगर येथील दहावीत शिकणाऱ्या मनीष रवींद्र कडुलकर (वय १७) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जगदीशचंद्र कांबळी यांनी पोलिसांत माहिती दिली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मनीष कडुलकर हा येथील एस.एम. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. शाळेत सकाळी नेहमीप्रमाणे जाऊन परीक्षेचा पेपर देऊन तो दुपारी घरी परतला. मनीष घरी आल्यानंतर त्याला सांगून बहीण घराबाहेर पडली. थोड्या वेळाने बहीण घरी परतली असता घराचे दरवाजे उघडे होते. तिने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता मनीष लाकडी बारास नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याची बहीण ओरडल्याने शेजारी राहणारे अॅड. हर्षद गावडे आदी मंडळींनी कडुलकर यांच्या घराकडे धाव घेतली, परंतु मनीष याचा मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले, तसेच मनीषच्या आई-वडिलांना कल्पना देण्यात आली. मनीषचे वडील देवगड येथे नायब तहसीलदार असून, आई कुडाळ तालुक्यात तलाठी म्हणून सेवेत आहेत. (प्रतिनिधी)
जानवलीत विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Published: February 04, 2016 1:24 AM