रत्नागिरी : दोन्ही पायाने अपंग असलेल्या दीपकला दोन हातांवर जोर देऊन पुढे सरकावे लागते. अपंग असल्याची सतत खंत बाळगणाऱ्या दीपकला बहिणीला ओवाळणी स्वकमाईतून देण्याचा आनंद आहे. केवळ जिद्द व कष्ट यामुळेच दीपक अपंगत्वावर मात करू शकला आहे. संगमेश्वरातील पुनर्वसन नगर येथे इंदिरा आवास योजनेंतर्गत दीपकच्या वडिलांना घर मिळाले आहे. परंतु, त्यामध्ये विजेचा पत्ता नाही. डोंगरावर बांधलेल्या घराच्या तीनही बाजूने शेती व जंगल आहे. केवळ पायवाटेने दीपकच्या घरी जाता येते. घोरपी समाजातील असल्याने दीपकचे वडील पारंपरिक पध्दतीने मासेमारी करतात, आई घरकाम करून उदरनिर्वाह चालवते. दीपकला एक बहीण व छोटा भाऊ आहे. बुरंबीतील सरफरे विदयालयात दीपक याने नववीपर्यत शिक्षण पूर्ण केले. इच्छा असूनही परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकला नाही. परंतु, छोट्या भावाला शिकण्यासाठी तो प्रोत्साहन देतो. त्यामुळेच तो आज अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. रक्षाबंधनादिवशी बहिणीने राखी बांधल्यानंतर ओवाळणीसाठी आई पैसे द्यायची. मात्र, दीपकला त्यामुळे ओशाळल्यासारखे वाटे. आपण काहीतरी करावे, असे वाटत असे. नववीनंतर शाळा बंद केल्यावर दीपकने आईवडिलांकडून प्रत्येकी ५० रूपये घेतले. मिळालेल्या शंभर रूपयातून मुळाभाजी विकत घेऊन ती संगमेश्वर बाजारात विकली. भाजी संपल्यावर दीपकचा आत्मविश्वास वाढला. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा काही भाजी खरेदी केली व विकली, असे करताकरता त्याचेकडे काही पैसे जमा झाले. मिळालेल्या पैशातून त्याने भाजी विक्री वाढविली. आज तो सर्व प्रकारच्या भाज्या संगमेश्वर बाजारपेठेत विकतो. दररोज संगमेश्वरात जाण्यायेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा दीपक याने बँकेकडून कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली आहे. दिवसाला तो दीड ते दोन हजार रूपयांची भाजी विकतो.रक्षाबंधनाला पूर्वी बहीण घरी येत असे. मात्र, दीपक आता स्वत:च्या गाडीने बहीण दीपालीकडे कोंड्ये (चिपळूण) येथे जातात. हातात दोन पैसे येत असल्यामुळे बहिणीसाठी व भाच्यांसाठी कपडे, खाऊ घेऊन जातात. आपण आता परावलंबी नाही याचा दीपकला विलक्षण आनंद आहे. शिवाय आपला भाऊ शिकावा, नोकरी करावी, अशी त्याची इच्छा आहे.अपंगासाठी बँकादेखील कर्ज देण्यासाठी हात आखडता घेतात. शासनाकडून ६०० रूपये एवढीच तुटपुंजी पेन्शन मिळते. महागाईने उग्र रूप धारण केले असताना अल्प पैशात जगावे कसे हा प्रश्नच आहे. त्यामुळे दीपक व त्याच्यासारख्या अन्य ६० अपंग मित्रांनी एकत्र येऊन संस्था स्थापन केली आहे. लवकरच ही संस्था ते नोंदणीकृत करणार आहेत. जे अपंग आहेत, काहीच करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांचा मानस आहे. दीपक यांचे घरासाठी चार वर्षे मागणी करून, पैसे भरूनही वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे दीपकच्या कुटुंबीयांना घरासभोवतालच्या जंगल व शेतीमुळे हिंस्त्र प्राणी, विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आहे. सायंकाळी पाचनंतर घराबाहेर पडू शकत नाही. असे असतानाही दीपक जिद्दीने व मेहनतीने प्रयत्न करीत आहेत. घराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. गाडी काही अंतरावर ठेवून तो दोन्ही हाताच्या सहाय्याने घरापर्यत येतो.
स्वकमाईतून भाऊबीज देण्याचा दीपकचा आनंद विरळाच
By admin | Published: August 28, 2015 11:48 PM