दोडामार्ग : विरोधकांच्या आक्रमकतेला आक्रमकतेनेच उत्तर देण्याच्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे दोडामार्गची शुक्रवारची आमसभा चांगलीच गाजली. आरोग्य, रस्ते आणि कृषी विभागाच्या प्रश्नावरून विरोधक काँगे्रस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तितक्याच आक्रमकतेने केसरकर यांनी उत्तरे दिली. काही प्रश्नांना आपण उत्तर देण्यास बांधील नसल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी विरोधकांना गप्प केले. विरोधकांच्या गोंधळाच्या वातावरणामुळे चिडलेल्या केसरकर यांनी अशी प्रवृत्ती कायम राहिल्यास पुढच्या आमसभेत पोलिसांची फौजच उभी करण्याचा इशारा दिला. एकंदरीत आजच्या आमसभेत विकासकामांबाबत ना सत्ताधाऱ्यांना आस ना विरोधकांना, फक्त सभेत कोण कोणावर बाजी मारतो यासाठी लागलेली चढाओढ प्रकर्षाने पहावयास मिळाली. दोडामार्गच्या ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दोडामार्गच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर होते. मात्र, प्रत्यक्षात कामावर नसल्याने एका निष्पाप जीवाचा वेळेवर उपचार न झाल्याने हकनाक बळी गेला. अशांवर कडक कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली. तर रुग्णालयातील अपूर्ण कर्मचारी वर्ग त्वरित भरण्यात यावा, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी मांडली. अखेर येत्या आठ दिवसात बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नुकसान होत असल्याचे सज्जन धाऊसकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताच कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना अहवाल देण्याची सूचना करण्यात आली. मांगेली येथील धबधब्याजवळील वाहनतळावर शुल्क आकारण्याचा अधिकार कोणाला आहे, असा प्रश्न उपस्थित करत ही जागा नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, याची माहिती मिळावी, असा मुद्दा विजय गवस यांनी मांडला. त्यावर पालकमंत्र्यांनी अहवाल देण्याची सूचना जिल्हा परिषद बांधकामच्या अधिकाऱ्यांना केली. तिलारी ते घोटगेवाडी रस्त्यावर खड्डे पडले असून ते त्वरित बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस यांनी केली. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पैसे असताना खड्डे का बुजवले नाहीत, असा जाब विचारला. (प्रतिनिधी)आरोग्यावरून वादंगपंचायत समितीच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी आमसभा घेतली जाते. वर्षातून एकदा तरी आमसभा घेणे अपेक्षित असते. त्या अनुषंगाने दोडामार्गची आमसभा शुक्रवारी झाली. या आमसभेत विकासकामांबाबत चर्चा जास्त होईल आणि राजकीय हेव्यादाव्यांवर कमी, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तालुक्यातील विकासकामांवर फारच अल्प चर्चा झाली आणि जास्तीत जास्त वेळ गोंधळाच्या वातावरणातच गेला.
सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
By admin | Published: June 05, 2015 11:47 PM