सिंधुदुर्ग (तळवडे) : सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-पेंडूर गावचे जागृत देवस्थान तसेच ‘कोंब्यांची जत्रा’ म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव बुधवारी भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या जत्रोत्सवाला लाखो भक्तांनी उपस्थित राहून नवसफेड करत देवाचे दर्शन घेतले. जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक राज्यात ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून प्रसिध्द असणा-या श्री देव घोडेमुखच्या वार्षिक उत्सवाला सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली होती. घोडेमुख देवस्थान रस्त्यापासून उंच डोंगरावर असल्याने व अबालवृध्दांना त्याठिकाणी जाणे अशक्य असल्याने डोंगराच्या पायथ्याशी केळी व नारळ ठेवण्यात येत होते. घोडेमुखला देण्यात येणारा कोंबा प्रत्येकाच्या हातात दिसून येत होता. सायंकाळी पाच वाजता मातोंड-पेंडूर गावची ग्रामदेवता सातेरी देवीची तरंगकाठी वाजतगाजत देव घोडेमुखाच्या दर्शनासाठी आल्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे देवाला कोंब्याचा मान देण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. ठिकठिकाणी गावकरमंडळींकडून कोंबे क ापण्यात येत होते. सायंकाळी उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, शिरोडा-सावंतवाडी महामार्ग काही काळ पूर्णपणे ठप्प पडला होता. सावंतवाडी व वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस या जत्रोत्सवावर पूर्ण लक्ष ठेवून होते. कुठल्याही अनुचित प्रकाराशिवाय हा जत्रोत्सव उत्साहात पार पडला.
‘कोंब्यांची जत्रा’! श्री देव घोडेमुख जत्रोत्सवाला भक्तांची गर्दी, 360 चाळ्यांच्या अधिपतींचे घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 3:52 PM