कणकवली : कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली येथे एका बिल्डरकडून फ्लॅटधारकाला ठार मारण्याची धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. बिल्डर आणि फ्लॅटधारकामध्ये असलेल्या बांधकामाच्या वादाची पार्श्वभूमी या घटनेमागे आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कणकवली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.फ्लॅटधारक तथा जानवली वाकडवाडी येथील साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किशोर अनंत दाभोलकर यांनी या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी बिल्डर सुभाष श्रीधर भोसले यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत आहे.या घटनेबाबत किशोर दाभोलकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते जानवली आदर्शनगर येथील साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचे विरोधक सुभाष श्रीधर भोसले हे त्या सोसायटीचे बिल्डर आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी किशोर दाभोलकर यांनी ग्राहक मंचाकडे निकृष्ट बांधकाम करून आपली फसवणूक केली म्हणून सुभाष भोसले यांच्याविरोधात तक्रार केली होती.तसेच सोसायटीमार्फत २०१५ मध्ये सार्वजनिक सोयीसुविधा आणि अनधिकृत बांधकाम या कारणांसाठी दिवाणी न्यायालयात दावाही दाखल केला आहे. तेव्हापासून किशोर दाभोलकर व सुभाष भोसले यांच्यात बोलाचाली नाही.किशोर दाभोलकर हे नेहमी सकाळी ते रहात असलेल्या साईसृष्टी सोसायटी ते जानवली साटमवाडी येथील गणेश मंदिरापर्यंत मॉर्निंग वॉकसाठी जातात.रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता आपल्या विरोधात तक्रार केली याचा राग मनात धरून सुभाष भोसले हे दुचाकी घेऊन त्यांच्या मागोमाग गेले. तसेच जानवली साकेडी-फाट्यानजीक दुचाकीवरून खाली उतरून किशोर दाभोलकर यांच्याकडे रागाने पाहून ‘थांब तुला ठार मारतो’ असे बोलून बाजूस असलेल्या कुत्र्याच्या दिशेने आपल्या हातातील काळपट रंगाच्या पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्या, असेही या तक्रारीत म्हटले आहे.घटना घडल्यानंतर घाबरलेल्या किशोर दाभोलकर यांनी आपले काही नातेवाईक तसेच मित्रांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत कणकवली पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर बिल्डर सुभाष भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.किशोर दाभोलकर यांनी तक्रार नोंदविल्यावर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण तसेच पथक तत्काळ जानवली येथील घटनास्थळी रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी गोळ्यांच्या पुंगळ्याचा शोध घेतला. मात्र, त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे घटनास्थळापासून जवळ असलेल्या घरातील रहिवाशांना या घटनेबाबत त्यांनी विचारले. त्यावेळी सकाळी फटाक्यांसारखा आवाज आल्याचे काही रहिवाशांनी सांगितले. त्यानंतर पिस्तुलाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी भोसले यांचे घर गाठले. यावेळी भोसले कामानिमित्त कोल्हापूर येथे गेले असल्याचे त्यांचे सुपुत्र कणकवली नगरपंचायतीचे आरोग्य सभापती विराज भोसले यांनी सांगितले. पोलिसांनी पिस्तुलाबाबत विचारणा केली असता ते सुभाष भोसले यांच्याकडे असते, असे त्यांनी सांगितले. तसेच पिस्तुलाचा परवाना आहे का? अशी विचारणा केली असता तो परवाना त्यांनी पोलिसांना दाखविला. त्यामुळे भोसले हे घरी आल्यावर त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात घेऊन या, असे विराज भोसले यांना सांगत पोलीस पथक माघारी परतले.पिस्तुलाची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करणारकिशोर दाभोलकर यांच्या तक्रारीवरून सुभाष भोसले यांच्याविरोधात गोळीबार प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल असला तरी त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार झाला आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पुढील तपास करण्यात येईल. तसेच त्यांचे पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तेथील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पिस्तूल वापरण्याचा परवाना असला तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा अनावश्यक वापर करणे गैर आहे. त्यामुळे आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीनेही कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यात येईल असे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.
जानवलीत पिस्तुलातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:14 PM