वैभववाडी : अन्न सुरक्षा योजनेच्या सुधारित इष्टांकाप्रमाणे एप्रिलचे धान्य प्राप्त होत नसल्यामुळे तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी धान्य उचल न करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत धान्य दुकानदार संघटनेतर्फे तहसीलदारारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्याला ३३ हजार ३८५ एवढे उद्दिष्ट मंजूर झाल्याचे सांगून आधार संलग्न शिधापत्रिकाधारकांच्या याद्या धान्य दुकानदारांकडून प्राप्त करून घेतल्या. त्या मंजूर करून पुन्हा धान्य दुकानांवर प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार मार्चपासून सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्यपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, जिल्हा पुरवठा विभागाकडे सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्य प्राप्त नसल्याने जुन्या पद्धतीने धान्य वितरण करण्यास सांगितले. त्याचवेळी एप्रिलपासून सुधारित याद्यांनुसार धान्यपुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे धान्य दुकानदारांनी एप्रिलपासून सर्वांना धान्य मिळेल असे सांगितले.धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार गावित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक स्वप्निल प्रभू, धान्य दुकानदार दिलीप कोलते, आण्णा शिंदे, किशोर जैतापकर, बाबू रावराणे, धनंजय नारकर, संतोष राणे, फैय्याज सारंग, बाबलाल लांजेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तोपर्यंत धान्याची उचल नाहीतहसील कार्यालयात नायब तहसीलदार जी. आर. गावित यांच्या उपस्थितीत सोमवारी धान्य दुकानदार संघटनेची मासिक बैठक झाली. त्यावेळी तालुक्याचे उद्दिष्ट कमी केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार धान्य दुकानदारांनी एप्रिलपासून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्वांना धान्य मिळणार असे सांगितले असताना नवीन उद्दिष्टाप्रमाणे धान्य वितरित न केल्यास धान्य दुकानदारांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेच्या सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्यपुरवठा होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील एकही रास्त धान्य दुकानदार धान्याची उचल करणार नाही, असा इशारा धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सुधारित इष्टांकाप्रमाणेच हवे धान्य
By admin | Published: April 04, 2017 8:23 PM