वैभववाडी : करुळ घाटाच्या मध्यावरील वळणावर कदंबा आणि शिवशाही या दोन बसची धडक झाली. त्यामध्ये कदंबा बसचा मागील भाग लागून शिवशाहीच्या मध्यभागातील दोन काचा फुटून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. दोन्ही वाहनांतील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास मिरज-वास्को ही कदंबा बस (क्रमांक जीए:०३; एक्स- ०६०३) घाट उतरुन येत असताना गगनबावड्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वेंगुल्यार्हून पुण्याला निघालेल्या शिवशाही बसची (क्रमांक एमएच:०४; जेके-०१९९) कदंबाशी गाठ पडली.
वळणामुळे थांबलेल्या कदंबा बसच्या मागील भागाची घाट चढणाऱ्या शिवशाही बसच्या मध्यभागी धडक बसली.या धडकेत शिवशाही बसच्या मध्यभागातील दोन काचा फुटून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने शिवशाई बसमधील प्रवाशांना दुखापत झाली नाही.शिवशाहीतील प्रवाशांना गगनबावडा येथे पोहोचवून बससह चालक बालाजी शांतीलिंग खोत पुन्हा वैभववाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याआधी कदंबाचा चालक दीपक श्रीपाद नाईक पोलीस ठाण्यात पोहोचला होता.सायंकाळी साडेचारपर्यंत कदंबा बसला पोलीस ठाण्यासमोर थांबावे लागल्याने प्रवाशांची कुचंबणा झाली होती.