कडावल : किनळोस येथील श्री माऊली मंदिर येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य लक्षात घेता पर्यटन विकासनिधीतून मंदिर परिसर तसेच नजीक असलेल्या वझर धबधब्याचे सुशोभिकरण करण्यात यावे तसेच पर्यटनविषयक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कोसळलेली दरड हटवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. येथील श्री माऊली मंदिर परिसराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. मंदिराच्या सर्व बाजूस असलेल्या विस्तीर्ण डोंगररांगा आणि जवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे. मंदिरापासून काही अंतरावर या ओढ्यावरच निसर्गरम्य असा वझर धबधबा आहे. अतिशय उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यामुळे परिसराला पर्यटनविषयक महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याच्या पर्यटनविषयक विकासाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन विकासनिधीतून अनेक धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण करून तेथे आधुनिक सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. मंदिर परिसर व वझर धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित केल्यास निसर्गाचे लेणे लाभलेल्या किनळोस गावाला पर्यटनाचा गाव अशी ओळख मिळणार आहे. रोजगार क्षमतेमध्ये वाढ होऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी परिसराचा नियोजनबद्ध विकास आराखडा करून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. गावाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास निधीतून मंदिर परिसर व वझर धबधब्याचे सुशोभिकरण करण्यात यावे, येथे पर्यटनविषयक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात व कोसळलेली दरड हटवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
किनळोस-माऊली मंदिरानजीक दरड कोसळली
By admin | Published: August 15, 2016 12:16 AM