कुडाळ - भाजपाचेसिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी भाजपाला रामराम करीत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. कुडाळकर यांचा प्रवेश शुक्रवारी मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. कुडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे सिंधुदुर्गातील भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
काका कुडाळकर यांच्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्कृष्ट संघटक म्हणून पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक होते. राणेंचे कुडाळ तालुक्यातील संघटनात्मक काम उत्कृष्टपणे बजावले होते. शिवसेनेत असताना सलग बारा वर्षे त्यांनी कुडाळ तालुकाध्यक्ष पद संभाळले होते. संघटन कौशल्यात माहीर असलेले काका कुडाळकर यांनी राणे यांच्या सोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले मात्र त्यानंतर कुडाळकर राजकीय गटातटाचे बळी ठरले अंतर्गत कुरघोडीमुळे कुडाळकर यांनी राणे ना सोडचिठ्ठी देत त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रथम राष्ट्रवादीत आणि त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला. संघटन कौशल्य आणि राजकीय कार्यक्रम घेण्यात तरबेज असलेले काका कुडाळकर यांना भाजपामध्ये वाव मिळेल असे वाटले होते.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिले वर्ष हिरहिरीने काम केले मात्र त्यानंतर त्यांची भाजपामध्ये घुसमट होऊ लागली त्यांच्या कामाला तिथे हवा तसा न्याय मिळत नव्हता त्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ होते भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांना हवा तसा सन्मान मिळाला नाही. त्यामुळे त्यांची घुसमट अधिकच होऊ लागली त्यामुळे त्यानंतर त्यांनी भाजपाचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला ज्यांच्या सोबत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्या माजी आमदार राजन तेली यांचेही त्यांनी याकडे लक्ष वेधले मात्र तेली यांनीही कुडाळकरांच्या म्हणण्याकडे हवे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे कुडाळकर यांनी भाजपाचे काम करण्याचे थांबवले काही महिने भाजपाच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहिले होते.
कुडाळकर हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान आता त्यांनी भाजपाला राम राम केला व कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांनी अलीकडेच भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता ते काँग्रेसच्या मुंबई येथील टिळक भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. कुडाळकर यांनी भाजपाला रामराम करीत काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश भाजपाला धक्का देणारा असून जिल्ह्यातील अन्य प्रमुख पक्षानाही कुडाळकर हे डोकेदुखी ठरतील असे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.