कणकवली : कलमठ-आचरा रस्त्यालगत बसलेल्या मच्छी विक्रेत्या सपना शिरसाट या महिलेला तेथून हटवण्यास गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी गौरव तांबे याला त्या महिलेने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी त्या महिलेवर पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मच्छी विक्रेत्याची ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची मजल गेल्याने कलमठ ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे. कलमठ-आचरा रस्त्यालगत अनधिकृतपणे काही मच्छी विक्रेते बसतात. त्यांच्यावर अधून-मधून कलमठ ग्रामपंचायतीतर्फे कारवाईचा बडगा उगारला जातो. कारवाई झाल्यानंतर काही दिवसात ते विक्रेते पुन्हा रस्त्यालगत मच्छी विक्रीचा व्यवसाय सुरू करतात.शुक्रवारी ग्रामपंचायत कर्मचारी गौरव तांबे हे रस्त्यालगत बसलेल्या सपना शिरसाट या महिला मच्छी विक्रेतीला हटविण्यास गेले असता, तिने त्यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली. हा प्रकार सरपंच संदीप मेस्त्री यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कणकवली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी आले आणि मारहाण करणा़ऱ्या त्या महिलेला ताब्यात घेत पोलिस ठाण्यामध्ये नेले. मारहाण झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार सपना शिरसाट हिच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.या कारवाईवेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, सोमनाथ पारकर, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक गुरव, खुशाल कोरगावकर, मंगेश कदम, रूपेश कदम, मोहन कदम, प्रतीक उकिर्डे आदी उपस्थित होते.
Sindhudurga: मच्छी विक्रेत्या महिलेकडून कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 4:38 PM