खारेपाटण : ७२ खेड्यांचे आराध्य देवस्थान असलेल्या खारेपाटण येथील काळभैरव मंदिराची फंडपेटी चोरट्यांनी शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास फोडून जवळपास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम लंपास केली. खारेपाटणसह दशक्रोशीतील या प्रसिद्ध देवस्थानात हा प्रकार घडल्याने खारेपाटण शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, शनिवार १ जून रोजी रात्री देवस्थान कमिटी अध्यक्ष व कर्मचारी मंदिर नेहमीप्रमाणे बंद करून गेले. त्यानंतर रात्री १२.४५ च्या सुमारास एका चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्याने मंदिराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडून आपल्या अन्य दोन साथीदारांना मंदिरात प्रवेश करण्यास दिला.
चोरीच्या तपासासाठी श्वानपथक मागविण्यात आले होते.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभागृहातील लाईट बंद करून या चोरट्यांनी बॅटरीच्या सहाय्याने फंडपेटीचे निरीक्षण केले. परंतु मंदिरातील दानपेटी जवळपास ६० ते ७० किलो वजनाची असल्याने चोरट्यांना उचलणे कठीण जात होते. २० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर या तीन चोरट्यांनी फंडपेटी उचलून मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेतमळ्यात नेऊन दगडाच्या सहाय्याने फोडून आतील सर्व रक्कम घेऊन ते ेपसार झाले. हे चोरीचे नाट्य जवळपास अर्धा तास चालू होते.रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गावातील काही लोक नदीवर आंघोळीसाठी जात असताना त्यांना फंडपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी मंदिर देखभालीसाठी असणारे तावडे यांना कल्पना दिली. तसेच तत्काळ काळभैरव, दुर्गादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव यांना कळविण्यात आले.
ही बातमी समजताच मंगेश गुरव, गोट्या कोळसुलकर, योगेश गोडवे, अण्णा तेली, बबन तेली व अन्य ग्रामस्थांनी मंदिरामध्ये येऊन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. त्यावेळी रात्री १२.४५ ते १.२० पर्यंत हे चोरीचे नाट्य घडल्याचे त्यात दिसून आले. या कॅमेºयामध्ये दोन चोरांचे चेहरे बºयापैकी दिसून आले असून संपूर्ण चोरी या कॅमेºयात कैद झाली आहे.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलीस उपनिरीक्षक पी. एन. कदम तसेच व्ही. एम. चव्हाण, कॉन्स्टेबल कोळी व कॉन्स्टेबल पाटील घटनास्थळी हजर झाले व संबंधित जागेचा पंचनामा केला. दुपारी ३.३० वाजता ओरोस येथून श्वानपथक मागविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सुरु असून सीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेजमुळे चोर सापडू शकतील असा प्राथमिक अंदाज आहे.तपास त्वरित करून चोरट्यांना जेरबंद करावे अशी विनंती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये परप्रांतीय लोकांनी झोपड्या बांधून वस्ती केली आहे. हे परप्रांतीय कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ येथून गावात वेगवेगळे व्यवसाय करून शेतमळ्यांमध्ये झोपड्या बांधून राहिले आहेत. या घटनेनंतर त्या लोकांची त्वरित तपासणी करून गाव सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.चोरांची टोळी संबंधित जागेशी परिचितमंदिरामध्ये चोरी करण्यासाठी आलेले तीनही चोर संबंधित जागेशी परिचित असल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचालींवरून संबंधित चोर संपूर्ण माहितगार असून या कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये गावातील एक व्यक्ती मंदिराच्या सभागृहाच्या टेबलवर झोपलेली आढळली आहे.
घटनेच्या आधी दहा मिनिटे ही व्यक्ती सभागृहात येऊन झोपली असून घटना घडून गेल्यानंतर दहा मिनिटांनी उठून गेली. त्यामुळे या चोरीच्या घटनेशी या संबंधित व्यक्तीचा थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ही दानपेटी उघडून त्यातील रक्कम बॅँकेत भरण्याची चर्चा मंदिरात झाली होती. ही चर्चा होत असतानासुद्धा ती या चोरट्यांच्या कानावर पडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.