कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने गेली २८ वर्षे रसिकांच्या पाठबळावर सुरू असलेल्या ' कणकवली नाट्यउत्सवाला' ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. हा नाट्यउत्सव आता ' मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य उत्सव' या नावाने ओळखला जाणार आहे. या नाट्य उत्सवात अभिनेते अमोल पालेकर यांना रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ संधी रसिकांना लाभणार आहे. अशी माहिती वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांनी दिली.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष ऍड. एन. आर. देसाई, कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह राजेश राजाध्यक्ष,खजिनदार धनराज दळवी, सदस्य मिलिंद बेळेकर, लीना काळसेकर आदी उपस्थित होते.वामन पंडित पुढे म्हणाले, ' कणकवली नाट्यउत्सव' या नावाने सर्वदूर पोहचलेल्या या महोत्सवाचे हे अठ्ठावीसावे वर्ष आहे. सिंधुदुर्गातील रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटके कणकवलीत पाहता यावीत , त्यांचा आस्वाद घेऊन रंगकर्मींशी थेट संवाद साधता यावा हा उद्देश समोर ठेवून हा नाट्यउत्सव सुरू करण्यात आला आहे.
या नाट्यउत्सवात १६० हुन अधिक दर्जेदार नाटके रसिकांना पाहता आली आहेत. यामध्ये प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्गज मराठी रंगकर्मीनी हजेरी लावली आहे. नसिरुद्दीन शाह, हबीब तन्वीर, अमोल पालेकर आदी नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. पगला घोडा, महानिर्वाण, घाशीराम कोतवाल, आईन्स्टाईन, कोपनहेगन अशी रंगभूमीवरील इतिहासात अजरामर झालेली नाटके सादर झाली आहेत.या महोत्सवाच्या २८ व्या वर्षी मालवणीची सांस्कृतिक पताका साता समुद्रापार नेणारे ज्येष्ठ अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचे नाव या महोत्सवाला द्यायचे निश्चित केले आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी प्रतिष्ठानवर विश्वासाने टाकली होती. या नाट्यउत्सवाबरोबर मच्छिंद्र कांबळी यांची स्मृती चिरंतन जपली जाईल. असा आम्हाला दृढ विश्वास आहे.यावर्षीचा महोत्सव ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना समर्पित करण्यात आला आहे. या महोत्सवात अमोल पालेकर यांचे दिग्दर्शकीय व अभिनय कौशल्य ' कुसुर' या एकपात्री नाटकात पहावयास मिळणार आहे. याशिवाय ' गुमनाम है कोई' हे व्यावसाईक रंगभूमीवर गाजत असलेले नाटक सादर होणार आहे.
कोकणचे सुपुत्र मामा वरेकर यांनी लिहिलेले ' भूमिकन्या सीता' हे नाटक, 'घटोत्कच',हंडाभर चांदण्या ', रामदास भटकळ लिखित ' जगदंबा' अशी नाटके पहाण्याचा दुर्मिळ योग या महोत्सवामुळे रसिकांना मिळणार आहे. 'जगदंबा' मध्ये भटकळ यांनी महात्मा गांधी विषयी स्वतःचे आकलन मांडले असल्याने, गांधीजींच्या दिडशेव्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हे नाटक या महोत्सवात समाविष्ट केले आहे. त्याशिवाय राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे एक रौप्य पदक आणि एक पारितोषिक असे दुहेरी यश मिळविणारे आचरेकर प्रतिष्ठानचे ' चाहूल' हे नाटक देखील सादर करण्यात येणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.नाट्य रसिकांना सुवर्ण संधी !या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील नाट्य रसिकांना सात विविध नाटके बघण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही वामन पंडित यांनी यावेळी केले.