कणकवली : 'दिगंबरा, दिगंबरा,भालचंद्र बाबा दिगंबरा' च्या जयघोषाने मंगळवारी सायंकाळी कणकवली नगरी दुमदुमुन गेली. निमित्त होते ते येथील श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथि महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे. अनेक भाविक या मिरवणूकित सहभागी झाले होते.२९ नोव्हेंबर पासून येथील आश्रमात परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथि महोत्सवाला प्रारंभ झाला होता. मंगळवारपर्यंतच्या कालावधीत याठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकड़ आरती ,समाधी पूजन, भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान, आरती,भजने, कीर्तन महोत्सव तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.मंगळवारीही पुण्यथिती दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड़ आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. समाधीपूजन , आरती , भजने या कार्यक्रमांबरोबरच दुपारी भाविकाना महाप्रसाद वाटप करण्यात आले.सायंकाळी ६ वाजल्यानंतर कणकवली शहरातून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. वारकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते. भाविकानी केलेल्या भालचंद्र नामाच्या जयघोषाने कणकवली नगरी दुमदुमन गेली होती.शहरातील तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळ, बाजारपेठेतील महापुरुष मित्र मंडळ , रिक्षा संघटना तसेच इतर अनेक मंडळानी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार तसेच चहा-पाण्याची सोय केली होती. तसेच विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. अनेक मंडळानी परमहंस भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील देखावेही पालखी मिरवणुकीच्या मार्गावर चौका-चौकात उभारले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरणच भक्तिमय बणले होते.पालखी मिरवणूक रात्री पुन्हा आश्रमात आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर हळवल येथील श्री भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाचा द्शावतारी नाट्य प्रयोग झाल्यावर या पुण्यतिथि उत्सवाची सांगता करण्यात आली.दरम्यान, या पुण्यतिथि महोत्सवासाठी गोवा,मुंबई, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील अनेक भाविक कणकवलीत दाखल झाले होते. मंगळवारी कणकवलीचा आठवडा बाजार असल्याने बाजाराच्या निमित्ताने कणकवलीत दाखल झालेल्या ग्राहकानीही परमहंस भालचंद्र महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.