कणकवली : कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.कणकवली शहरातील नागरिकांनी पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला इशारा दिला होता. मात्र कशाचेच काहीही न वाटणाऱ्या दिलीप बिल्डकाँन या महामार्ग ठेकेदार कंपनीने आवश्यक अशी कोणतीही कामे केली नाहीत.
रामेश्वर प्लाझा नजीक असलेल्या नाल्याचे काम करण्यासाठी तेथील महामार्गच खोदण्यात आला आहे. तसेच याठिकाणी महामार्ग परिवर्तीत करण्यात आला आहे. हा महामार्ग कच्चा असल्याने तो पावसाच्या पाण्याने चिखलमय बनला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना महामार्गावरून चालणे कठीण बनले आहे.पावसाच्या तुरळक सरी सध्या कोसळत असताना पाण्याचा फटका वाहन चालक आणि कणकवली परिसरातील सर्वसामान्यांना बसत आहे. जर मुसळधार पाऊस पडला तर नेमकी महामार्गाची काय स्थिती होईल ? या विचारानेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचा बेजबादारपणा कणकवलीवासीयांना भोवत आहे. शहरातील मान्सूनपूर्व कामे करण्याचे आश्वासन देऊनही ते या कंपनीने पाळले नाही.त्याचा फटका आता कणकवली वासियाना बसत आहे.सर्व्हिस रोड लगत गटारे न बांधता केलेल्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालताना तसेच वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.महामार्ग ठेकेदाराने गटारे मोकळी न केल्याने महामार्गालगत अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. तर दिलीप बिल्डकॉनच्या बेफिकीर वृत्तीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघात होण्याची शक्यता!पावसाच्या पाण्यामुळे महामार्गावर चिखल निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यातच चिखलापासून वाचण्यासाठी पादचारी डांबरी रस्त्यावर येतात. याचवेळी अचानक एखादे वाहन आल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कणकवली शहरातील महामार्ग बुधवारी पुन्हा एकदा चिखलमय झाला होता. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.