कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या कोचिवल्ली डेहराडून एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरीस गेला होता. याचोरीप्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या दोघा युवकांना अटक केली आहे.
नृपेंद्र मुन्नेसिंग व रणजीत उर्फ़ लकी मुन्नेसिंग अशी त्या युवकांची नावे आहेत. दरम्यान , या चोरट्याना पोलिसांनी अटक केल्याने रेल्वेतील आंणखिन काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केरळ राज्यातील इचूर येथील मनमोहन व्ही.के. 28 जून रोजी कोचिवल्ली डेहराडून एक्सप्रेस मधून प्रवास करीत होते. कणकवली रेलवस्थानका दरम्यान गाडी आली असता एस 2 या डब्यात त्यांनी आपला मोबाईल चार्जिंग साठी लावला होता. तसेच ते स्वच्छतागृहात गेले. तेथून परत आल्यावर त्यानी पाहिले असता त्यांचा मोबाईल जागेवर नव्हता. त्याबाबत त्यांनी तिकीट तपासणीसाकडे तक्रार नोंदविली. त्यांनी त्याबाबत रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाला माहिती दिली. रत्नागिरी येथुन कणकवली रेल्वे सुरक्षा बलाला कळविण्यात आले. त्यांनी अधिक तपासासाठी कणकवली पोलिसांकड़े हा गुन्हा सोपविला. 21 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करून कणकवली पोलिसांनी तपास सुरु केला.
तांत्रिकदृष्टया या मोबाईलचा शोध घेतला असता उत्तरप्रदेश येथील बिजनोर जिल्ह्यातील पुरैना येथे संबधित मोबाईल वापरात असल्याचे समजले. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशाने कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी व स्थानिक गुन्हे अन्वेषनचे प्रताप पाटील यानी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, संजय चव्हाण, अनुपकुमार खंडे, प्रथमेश गावडे आदींचे पथक उत्तरप्रदेश येथे पाठविले.
तेथून नृपेंद्र मुन्नेसिंग(22) या तरूणाला मोबाईलसह ताब्यात घेतले. चौकशी अंती त्याने आपल्याला भावाने मोबाईल दिल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रेल्वेत कॅटरिंगचा व्यवसाय करणारा त्याचा भाऊ रणजीत उर्फ़ लकी मुन्नेसिंग( 27) याला रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून 27 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.
या दोघा आरोपीना कणकवली येथे आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यामुळे त्याना अटक करण्यात आली. त्याना देवगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.