सिंधुदुर्ग : राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान या केंद्रीय मनुष्यबळ आणि मानव संसाधन अन विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आयोगामार्फत कणकवली कॉलेजला भौतिक सुविधांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या निधीसाठी मंजुरी मिळालेले कणकवली कॉलेज हे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयाला नॅक अ श्रेणी सातत्याने मिळविणारे व मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र शासन अंतर्गत महाविद्यालयात गुणवत्ता यादीमध्ये १० व्या नंबरवर महाविद्यालय पात्र ठरलेले आहे.सदर केंद्र सरकारच्या मिळणाऱ्या या निधीसाठी महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के व रूसामार्फत ६० टक्के असा निधी मिळतो. महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के योगदान होताच सदर निधीचा लाभ महाविद्यालयाला होणार आहे. या निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याकामी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी. डी. कामत व अन्य पदाधिकारी यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय पातळीवर केवळ ५०० महाविद्यालयांना पात्रतेनुसार सदर योजनेचा लाभ मिळतो. यापैकी कणकवली महाविद्यालय २०७ व्या क्रमांकावर असून महाराष्ट्र शासनाच्या ४० टक्के योगदान व निधी मंजुरीची केंद्र शासनाची अट आहे.
शासनाकडून वेळीच योगदान व निधी प्रदान झाल्यास महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करणे संस्थेला शक्य होईल व त्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती संस्थेचे चेअरमन पी.डी. कामत व प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी दिली.