कणकवली : सिंधुदुर्गात विकासासाठी निधी वाटप करताना सर्वांत झुकते माप कणकवली शहराला दिले आहे. तर कणकवली शहराची क्रीडा मैदानाची गरज पूर्ण करण्याचा यापुढे आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहणार आहे. कनक म्हणजे सोने. त्यामुळे कणकवली ही खरी सोन्याची भूमी करायची असेल तर मी एकटा काही करू शकणार नाही. त्यासाठी तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे. कणकवली हे जिल्ह्याच्या विकासाचे केंद्र बनावे यासाठी आपण सर्वांनी पक्षभेद विसरून प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.कणकवली नगरपंचायतीतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात सकणकवली पर्यटन महोत्सव २०१६’चे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष नरेन राणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल रावराणे, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, अवधूत मालणकर, नगरसेवक सुशांत नाईक, राजश्री धुमाळे, नंदिनी धुमाळे, सुमेधा अंधारी, प्रा. दिवाकर मुरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, नायब तहसीलदार संतोष खरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे, व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेश कामत, सचिन सावंत, स्नेहा तेंडोलकर उपस्थित होते.दीपक केसरकर पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर मंत्रिपदाची जबाबदारी देताना कोणतीही राजकीय जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाकडे मी लक्ष केंद्रित करू शकलो आहे. जिल्ह्यासाठी भरभरून निधी देतानाच फक्त कणकवलीसाठी आतापर्यंत पाच कोटी ६९ लाखांचा निधी दिला आहे. येथील मुडेश्वर मैदान सुसज्ज करण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्यात येईल. तसा प्रस्ताव नगरपंचायत प्रशासनाने सादर करावा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. कणकवली नगरपंचायतीची एक कोटी ६८ लाखांच्या निधीची कामे मंजुरीअभावी अखर्चित राहिली असल्याचे मला समजले. मात्र, हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण करून कोणी विकास रोखत असेल तर शासन त्याची गंभीर दखल घेईल. गड नदी, जानवली नदीवर बोटिंग प्रकल्प व्हावा, तसेच सावडाव धबधबा आणखी विकसित व्हावा, यासाठी आपले प्रयत्न राहतील. वैभव नाईक व संदेश पारकर यांनी या कामांसह गोपुरी आश्रमाच्या विकासासाठी प्लॅन बनवावा व तो आपल्याकडे द्यावा. त्यावर निश्चितच अंमलबजावणी करण्यात येईल. व्यापारासाठी प्रसिद्ध असणारे कणकवली शहर टुरिस्ट शहर म्हणून नावारूपास यावे, यासाठी आता प्रयत्न व्हायला हवेत.संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आमचा प्रयत्न असून जिल्हा परिषदेला ग्रामीण पर्यटनासाठी २० कोटींचा निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. विजयदुर्ग खाडीचा विकास करण्यात येणार असल्याचे सूतोवाच करून पर्यटक जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत जाऊ शकतील, अशा वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी युती शासन कटिबद्ध आहे. पर्यटन महोत्सवातून पर्यटनवृद्धीस मदत होते. त्यामुळे खंड पडलेला महोत्सव नगरपंचायतीने पुन्हा सुरू केल्याबद्दल धन्यवाद देतो. पालकमंत्री केसरकर किंवा आम्ही नुसत्या घोषणा करणारे नव्हेत. कणकवलीच्या विकासासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठीच पारकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय पक्षांची पादत्राणे बाहेर ठेवून सर्वांनी काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.संदेश पारकर म्हणाले, प्रत्येकवेळी राजकीय भूमिका घेणे योग्य नाही. वैभव नाईक व पालकमंत्र्यांनी चांगली मदत केली आहे. संवाद साधता यावा यासाठी हा महोत्सव आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शहर विकासासाठी सर्वांनी काम करूया.यावेळी नरेन राणे, विजयकुमार वळंजू, माधुरी गायकवाड, पद्मजा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कन्हैया पारकर यांनी प्रास्ताविक, तर राजेश कदम व नीलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक सुशांत नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कणकवली विकासाचे केंद्र बनवूया!
By admin | Published: May 09, 2016 12:31 AM