कणकवली : लोकसभा निवडणूक कालावधीत रात्री ११ नंतर हॉटेल तसेच दुकाने सुरू ठेऊ नयेत असे आदेश निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. मात्र, कणकवली शहरात काही हॉटेल व दुकाने चालू असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. ही तपासणी मंगळवारी रात्री कणकवली पोलिसांच्या पथकाने केली. तसेच संबधित दुकानदार व लॉज मालकांना न्यायालतात हजर केले असता दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पोलिसांनी लॉजमालकांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार रजिस्टर मेन्टेन करणे आवश्यक होते. तसेच रात्री ११ नंतर शहरातील दुकानदारांनी आपला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते.
तरीही शहरातील काही लॉज मालकांनी कोणतेही रेकॉर्ड ठेवलेले नसल्याचे आढळून आले. त्यांना दंड करण्यात आला. शहरातील कॅफे , आईस्क्रीम दुकान, चायनिज सेंटर तसेच काही हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नरडवे रोडवर आज एका बाजूने वाहतूक
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा असल्याने पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
कणकवलीत १८ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्या आदेशानुसार नरडवे नाका ते रेल्वेस्टेशन या परिसरात दुचाकी पार्किंग, राजन तेली यांच्या निवासस्थानाच्या पाठिमागे कार पार्किंग तसेच डॉ. म्हसकर हॉस्पिटलपाठिमागे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
सभा असल्याने रेल्वेस्टेशन ते नरडवे नाक्यापर्यंत एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली.