कणकवली : कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून सर्व्हिस रोड वर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी सहा महिन्याचे नगराध्यक्षपदाचे मानधन आपण देणार आहोत. सुमारे ९० हजार रुपयांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. अशी घोषणा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंगळवारी केली.
कणकवली नगरपंचायत कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, महेश सावंत आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, यापूर्वी नगराध्यक्षपदाचे मानधन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांना कोविड काळात कमळ थाळी देण्याकरीता व शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली होती. त्याचप्रमाणे पुढील सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाकरिता देण्यात येणार आहे. ही रक्कम तेथील मंडळाने शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरावी.
संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतरण व्हावे अशी आमची इच्छा आहे. यापूर्वी कणकवली नगरपंचायतकडून पुतळा स्थलांतरणाकरिता पाचशे चौरस फुटाच्या जागेचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने अन्य बाबी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या आहेत. आता जिल्हाधिकारी पुतळा स्थलांतरणाबाबत निर्णय घेतील. पालकमंत्री उदय सामंत व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पुतळा स्थलांतरणासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तेथील १८ गुंठे जागेची मोजणी देखील करून घेण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील या महत्वपूर्ण कामाकरिता माझा हातभार लागावा म्हणून सहा महिन्यांच्या मानधनाची रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याचे नलावडे यांनी सांगितले.