कणकवली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावेद शेख याच्याबरोबर कणकवली नगराध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी नगराध्यक्षांची शासकीय चार चाकी गाडी ताब्यात घेतली आहे.अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अवधूत बणकर यांनी दिली.
कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिरानजीक १६ एप्रिल रोजी पोलीस कर्मचारी आशिष जमादार बंदोबस्ताला होते. यावेळी आपल्या घरासमोरून रस्त्यावर सारखी ये-जा करणाऱ्या जावेद शेखला पोलीस कर्मचारी जमादार यांनी अटकाव केला होता . यावरून राग आल्याने जावेद याने त्यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली होती . त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणले होते. त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप नलावडे , अबीद नाईक हे पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी नगरपंचायतीची (क्रमांक एम. एच.०७- ए.जी.३७००)ही चारचाकी गाडी त्यांनी तिथे नेली होती. त्यामुळे संबधित गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी ती गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी जमादार यांच्या तक्रारीवरून जावेद शेख , नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप नलावडे , अबीद नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे जावेद याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. मंगळवारी दिवसभर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.
नगराध्यक्षांची शासकीय गाडी जप्त होणे ही लज्जास्पद बाब !
कणकवली नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणी-सुशांत नाईक यांची टीका
कणकवली : कणकवली नगराध्यक्षांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नगरपंचायत प्रशासनाची गाडी जप्त होणे ही लज्जास्पद बाब आहे.नगराध्यक्षांची गुन्हेगारी प्रवृत्ती अशीच सुरु राहील्यास भविष्यात कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची खुर्चीही पोलिस जप्त करतील अशी उपहासात्मक टीका कणकवली नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक यांनी केली आहे. कणकवली येथील विजय भवन येथे मंगळवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर , शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन सावंत, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
- पोलिस प्रशासनाने नगराध्यक्षांनी केलेल्या दादागिरीनंतर खबरदारीचा उपाय म्हणुन नियमांची कडक अंमलबजावणी करताना सर्वसामान्यांच्या गाड्या जप्त केल्या.आता पोलिसानी नगरपंचायतीच्या मालकीची असलेली गाडी जप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात प्रथम सर्वसामान्यांच्या जप्त केलेल्या गाड्या पोलिसानी सोडाव्यात आणि त्यानंतरच नगरपंचायतीची गाडी सोडावी . सर्वसामान्यांना एक न्याय आणि उच्चभ्रूना वेगळा न्याय असे करु नये .
- रुपेश नार्वेकर म्हणाले, पोलिसांना धमकावणीसारख्या केलेल्या प्रकारामुळे कणकवलीची मान शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे नगराध्यक्षानी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
- शैलेश भोगले म्हणाले, वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षानी प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे होते. त्यांनी पोलीसांसमोर हजर राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती. मात्र नगराध्यक्षानी पळपुटेपणाची भुमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
- कन्हैया पारकर म्हणाले, नगराध्यक्ष झाल्यापासुन समीर नलावडे यानी गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवली आहे.
- चांगल्या कामामुळेच विरोधकांच्या पोटात पोटशुळ !
संजय कामतेकर,बंडू हर्णे यांची टीका; सुशांत नाईक यांचे शहरासाठी योगदान काय
कणकवली : गाडी जप्तीचे भांडवल करून कणकवली नगराध्यक्षांच्या बदनामीचा प्रयत्न नगरपंचायतीच्या विरोधी नगरसेवकांनी सुरू केला आहे. त्यासाठी ते खोटे नाटे आरोप करत आहेत.लॉकडाऊन काळात नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमने शहरात महत्वपूर्ण काम केले आहे. या चांगल्या कामामुळेच विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठला आहे. पण त्यांच्यावर टीका करणार्या सुशांत नाईक आणि इतर नगरसेवकांचे शहरवासीयांसाठी योगदान काय आहे ? हा प्रश्न त्यांची स्वतःलाच विचारावा अशी टीका नगरपंचायतीने गटनेते संजय कामतेकर, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि नगरसेवक बंडू हर्णे यांनी येथे केली.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यासह विरोधकांच्या आरोपाना त्यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण , नगरसेवक अॅड.विराज भोसले, माजी नगरसेवक किशोर राणेे, बंडुु गांगण उपस्थित होते.
यावेळी संजय कामतेकर म्हणाले, कणकवलीत चांगल्या प्रकारे काम आम्ही करीत आहोत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासुन जंतुनाशक तसेच डास निर्मुलन औषध फवारणी, सॅनिटायझर टनेल , ५४० गरजवंताना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप त्याचप्रमाणे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या एक वर्षाच्या मानधनातुन दररोज २०० पेक्षा जास्त लोकाना मोफत कमळ थाळी वाटप यासारखे उपक्रम राबवित आहोत. त्यामुळेच विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांच्या पोटात पोटशुळ उठला आहेे. त्यातूनच नगराध्यक्ष व त्यांच्या टिमची बदनामी करण्याचे काम हे विरोधक करत आहेत.