कणकवली : महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दरम्यान , ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्यात येईल . असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात झाली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड उपस्थित होते.या नगरपंचायत सभेत प्रामुख्याने महामार्गाच्या संदर्भातील समस्या नगरसेवकांनी मांडल्या. गेल्या वर्षी प्रांताधिकारी कार्यालयाकडील नाला तुंबल्याने शहरातील अनेक घरात पावसाचे पाणी घुसले होते. तर जानवली नदी लगतच्या सखल भागातील घरांमध्येही पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते . यावर्षी देखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.महामार्गालगतची गटारे उंच झाली आहेत. तर सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे सखल भागात आहेत. ही गटारे सुस्थितीत ठेवण्याबाबत महामार्ग ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतलेली नाही. उलट अनेक गटारे बंद करण्यात आली आहेत. तर काही गटारांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
याबाबत महामार्ग ठेकेदाराला जाब विचारून देखील कोणतीही कार्यवाही होत नाही. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार निघून जाईल. मात्र सांडपाणी निचरा न झाल्यास शहरवासीयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागेल अशी भीती कन्हैया पारकर, सुशांत नाईक, बंडू हर्णे, अभिजित मुसळे आदी नगरसेवकांनी व्यक्त केली.शहरातील पटवर्धन चौकात सातत्याने पाणी तुंबून राहते. आचरा रस्त्यावरून येणारे हे पाणी महामार्गाच्या गटारांमध्ये आणण्याची कोणतीही व्यवस्था ठेकेदाराने केलेली नाही. त्यामुळे पटवर्धन चौक परिसर सातत्याने जलमय होणार असल्याचे सुशांत नाईक म्हणाले. तर गांगोमंदिर परिसरातील नाल्याचा मार्ग वळविण्यात आला आहे. यात मसुरकर किनई रोड भागातून येणारे पाणी महामार्गाच्या गटाराला न जोडल्यास गांगोमंदिर परिसरात पाण्याला जाण्याचा मार्गच उरणार नाही. त्यामुळे येथील घरे पाण्याखाली जातील अशी भीती शिशिर परुळेकर यांनी व्यक्त केली.शहरातील महावितरण कार्यालय, एस.टी.विभागीय कार्यशाळा रस्ता याठिकाणीही महामार्गाची गटारे उंच आहेत. तर तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारे नाहीत. त्यामुळे यंदा देखील येथील घरांमध्ये पावसाचे पाणी जाण्याचा धोका असल्याचे कन्हैया पारकर, अभिजित मुसळे, सुशांत नाईक म्हणाले.महामार्ग समस्यांच्या प्रश्नावर नगराध्यक्षांनी ठेकेदार प्रतिनिधीशी चर्चा करावी असा मुद्दा कन्हैया पारकर यांनी मांडला. तर यापूर्वी अनेक बैठकी झाल्या, पण ठेकेदार मंजूर कामाव्यतिरिक्त कुठलेच काम करत नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीलाच यातून मार्ग काढावा लागेल असे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले.यानंतर नगरसेवकांच्या विविध सूचना, तक्रारीनंतर पुढील आठवड्यात महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार आणि सर्व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. तर पावसाळ्याच्या आधी शहराच्या कुठल्याही भागात पाणी साठून राहू नये यासाठी तात्पुरती गटारे उभारण्याचे निर्देश नगराध्यक्ष नलावडे यांनी अधिकार्यांना दिले.गटारे सफाई करताना त्यात कर्मचारी अपघातग्रस्त होऊन मृत्यू सारख्या घटना घडू नयेत यासाठी मुख्याधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कर्मचार्यांची समिती स्थापन करण्यास सभागृहाने यावेळी मान्यता दिली. धोकादायक ठिकाणच्या गटार सफाई काम करण्यापूर्वीच्या सुरक्षेच्या उपाययोजनाबाबत ही समिती लक्ष ठेवून असणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.