कणकवली: नागरी प्रशासनाच्या विविध कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून कणकवली नगरपंचायत राज्यात प्रथम आली आहे. यामुळे कणकवली नगरपंचायतच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नगरपंचायतने कर वसुली व राबवलेल्या विविध उपक्रमाबाबत हा गौरव करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर विकास दिनानिमित्त नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे प्रशस्ती पत्र सुपूर्द करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, इतर नगरसेवक यांच्यासह मुख्याधिकारी व नगरपंचायतच्या कर्मचारी वर्गाने सन २०२२-२०२३ या वर्षात केलेल्या कामाचा हा गौरव राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. नगरपंचायतने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मानांकन मिळवण्याबरोबरच अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. राज्यात नगरपंचायत वर्गवारीमध्ये कणकवली नगरपंचायतचा प्रथम क्रमांक आला आहे. या यशाबद्दल नगरपंचायतीच्या विद्यमान पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
कर वसुलीसह अन्य उपक्रमात कणकवली नगरपंचायत राज्यात प्रथम
By सुधीर राणे | Published: April 20, 2023 4:25 PM