कणकवली : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कणकवली शहर विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदारी घेऊन अनधिकृत जाहिरात घोषणाफलकांवर नियमित कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत कणकवली नगरपंचायतमार्फत कणकवली शहरातील सर्व नागरिकांना, पक्षप्रमुख, व्यवसायिक यांना जाहिरात घोषणा फलक, होर्डिंग पोस्टर्सच्या परवानगीबाबत अटी व शर्तीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,शहरात जाहिरात प्रसिध्दीस परवानगी मिळण्यासाठी आवश्यक तो कर व अनामत रकमेचा भरणा आगाऊ करणे आवश्यक आहे. जाहिरातीबाबतची परवानगी ज्या कालावधी पुरती दिली असेल त्या मुदती बाहेर पूर्व परवानगीशिवाय जाहिरात फलक आढळल्यास ती जप्त करण्यात येऊन कारवाई केली जाईल. शासकीय, निमशासकिय सार्वजनिक ठिकाणच्या जागेत संबंधीत संस्थांच्या पूर्व परवानगी शिवाय जाहिरात प्रसिध्द करता येणार नाही. तसे आढळून आल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता असे फलक जप्त केले जातील. नगरपंचायत हद्दितील फलकासाठी परवानगी घेणे बंधनकारक राहील. फलक लावल्यानंतर वाहतुकीस अथवा रहदारीस अडथळा झाल्यास फलक काढण्यात येतील. धार्मिक अथवा सामाजीक तेढ निर्माण करणारे जाहीरात फलक प्रकाशित करण्यात येणार नाही. जाहिरातीवर प्रिंटरचे नाव, मुदतीचा कालावधी, नगरपरिषद परवाना क्रमांक व दिनांक तसेच कणकवली नगर पंचायत मार्फत पुरविण्यात आलेला क्यूआर कोड यांची स्पष्टपणे नोंद घेणे बंधनकारक राहिल.
अनधिकृत जाहिरात फलकांवर कणकवली नगरपंचायत उगारणार कारवाईचा बडगा
By सुधीर राणे | Published: December 16, 2023 4:49 PM