कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा सन २०२१-२२ चा ८२ लाख ८७ हजार ९७६.६६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ४५ कोटी १३ लाख ५१हजार ३७८ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्याचा समावेशही केला जाणार आहे.कणकवली नगरपंचायतीचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा एकूण अर्थसंकल्प ४५ कोटी ९६ लाख ८ ३९ हजार ३२४ रुपयांचा आहे.गतवर्षी कणकवली नगरपंचायतीचे अंदाजपत्रक सुमारे ६४ कोटींचे होते. मात्र यावर्षी त्यातील सुजल निर्मल अंतर्गतच्या योजनेचे अंदाजित २५ कोटींची तरतूद बजेटमध्ये रद्द करण्यात आल्याने ४५ कोटी ९६ लाख ३९ हजार ३५४ रुपयांचे अंदाजपत्रक अर्थसंकल्पीय सभेत सादर करण्यात आले.कणकवली नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यासभेला नगरपंचायतीचे नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले होते.या सभेत कणकवली शहर विकासाच्या अनुषंगाने विविध हेडखाली तरतूद करण्यात आली असून, त्यात अग्निशमन, नळ योजना दुरुस्ती, कोंडवाडा, शहरातील विकास कामे, कणकवली नगरपंचायतचा पर्यटन महोत्सव अशा अनेक बाबींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून ठेवण्यात आली आहे.नगरपंचायतीला येत्या आर्थिक वर्षात करांच्या माध्यमातून १ कोटी ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. तर आस्थापना आणि प्रशासकीय खर्च, विविध प्रकारचे भत्ते आदींसाठी ८ कोटी ८५ लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गतवर्षी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर यंदा कुत्रे पकड मोहीम राबविण्यात येत असल्याने १५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यंदा देशाची जनगणना होणार आहे. त्याअनुषंगाने नगरपंचायतीने जनगणनेसाठी ५ लाखांची तरतूद केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा जानेवारी महिन्यातील नगरपंचायतीचा महोत्सव रद्द करण्यात आला. मात्र सन २०२२ च्या महोत्सवासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.येत्या आर्थिक वर्षात नगरपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून दोन कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तर अंतर्गत ४ कोटी तर राज्यस्तर अंतर्गत ८ कोटी रुपये निधी मिळण्याची शक्यता अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली आहे.नगरपंचायतीला सन २०२१ -२२ या आर्थिक वर्षात शासनाकडून विशिष्ट प्रयोजनाकरिता अनुदाने, अंशदाने यांच्या माध्यमातून ४५ कोटी ९६ लाख ३९ हजार ३५४.६६ रुपये मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रारंभीची शिल्लक २ कोटी ५० लाख ७३५४.६६ एवढी आहे.
महसुली जमा ८ कोटी ८५ लाख १४ हजार रुपये होतील. तसेच भांडवली जमा ३४ कोटी ६१ लाख १८ हजार रुपये होतील. महसुली खर्च ८ कोटी ८५ लाख ३० हजार ३७८ रुपये होईल अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. तर भांडवली खर्च ३६ कोटी २८ लाख २१हजार रुपये असेल.