कणकवली : “सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणारआहेत. शिवसेना सोडणाऱ्यांबाबत काय करायचे ते उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीपक केसरकर किंवा अन्य कुठलाही आमदार असो, जो पक्ष सोडेल त्याच्या विरोधात कायमच संघर्ष करायचा असा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सावंतवाडीत सोमवारी शिवसैनिक एकत्र येणार असून आमची ताकद काय आहे? ते त्यावेळी दिसून येईल,” असा इशारा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हासंपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी दिला.
कणकवलीतील विजयभवनमध्ये शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक शुक्रवारी झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अरुण दुधवडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते ,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला संघटक निलम सावंत-पालव,जान्हवी सावंत,शैलेश भोगले,राजू शेट्ये,रुपेश राऊळ,मंगेश लोके,बाबुराव धुरी,शब्बीर मण्यार,शेखर राणे,राजू राठोड आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेना म्हणावी तशी आक्रमक का झालेली नाही? या प्रश्नावर अरुण दुधवडकर म्हणाले, पुढील काळात या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे तुम्हाला मिळेल. सध्या राज्याच्या सर्व भागातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. जर केसरकर यांनी शिवसेना साोडली तर शिवसैनिक निश्चितपणे त्यांना काय उत्तर द्यायचे ते देतील.
आता शिवसेनेतून गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे आहेत. आमचे लढवय्ये नेते वैभव नाईक आहेत.आमदार दीपक केसरकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंचा आदेश येताच निर्णय घेतला जाईल.ते ज्या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी शिवसेनेत आले आणि आता त्यांच्यासोबत ते पुन्हा जात असतील, तर आमदार दीपक केसरकर भेटल्यावर त्यांची नेमकी भूमिका काय? हे आपण विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जे आमदार आमच्यापासून वेगळे झाले आहेत. त्यांना तर आम्ही प्रत्युत्तर देऊच. परंतु आपण सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. असे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले असून तो निरोप मी उद्धव ठाकरेंना देणार आहे. ज्यावेळी वर्षावर बैठक झाली, तेव्हा २९ आमदार होते. त्यात दीपक केसरकर होते.त् यावेळी शिवसेनेसोबत राहण्याची भूमिका होती. मात्र, ते राणेंच्या विरोधात लढत होते, आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्या भूमिकेनंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ असा इशारा अरुण दुधवडकर यांनी यावेळी दिला.त्यांच्या भूमिकेनंतर निश्चित पडसाद उमटतील!आमदार दीपक केसरकर यांची भूमिका प्रथम स्पष्ट होऊ देत. मग आम्ही आमची भूमिका ठरवू. सध्या आम्हाला त्यांची नेमकी दिशा समजत नाही. ती समजली की शंभर टक्के जिल्ह्यात पडसाद उमटतील, असे यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले.