कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत गेले पाच दिवस अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाची संततधार कायम असून सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी- नाल्यांना पूरसदृश पाणी आले आहे. तालुक्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चौविस तासात सरासरी १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १ जून पासून आतापर्यंत तालुक्यात १,९३० मिलिमीटर पाऊस झाला आहे.दरम्यान,काही वेळ पाऊस थांबला की, नदी, नाल्यांमधील पाणी बऱ्यापैकी ओसरत आहे.त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. ग्रामीण भागांमधील अनेक नदी- नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
काही ठिकाणचे पाणी ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.सध्या संततधार पाऊस पडत असून अधून मधून मोठ्या सरीही कोसळत आहेत. ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठया अडचणीना सामोरे जावे लागत आहेरविवारी दुपारनंतर पावसाने दमदार सुरुवात केली तर गुरूवारी सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने अंधार दाटून आला होता. पावसामुळे कणकवली शहरालगतच्या जानवली आणि गडनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भात शिवारातही पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना लावणीचे काम थांबवावे लागत आहे.
कणकवली शहरात दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. तेलीआळी तसेच इतर भागात रस्त्यावर पाणी साचत आहे. पाऊस गेल्यावर हे पाणी ओसरत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातही पाणी साचत आहे. एक वाहन दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना रस्त्याचा पाण्यामुळे अंदाज न आल्याने वाहने गटारात जात आहेत. यामध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत उभारण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्यावरील पाणी निचऱ्याची समस्या कायम आहे. तर उड्डाणपुलाच्या पाणी निचरा पाईपला गळती लागल्याने पुलावरील पाणी थेट रस्त्यावर कोसळत असल्याने पादचाऱ्यांना खालून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे कोणी लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.