कणकवली: कणकवलीच्या जनतेने पाच वर्षांपूर्वी आमच्यावर विश्वास दाखवून नगरपंचायतची सत्ता आमच्या हाती दिली. त्यावेळी जे शब्द आपल्याला दिले ते सगळे आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. आपल्याला पुढच्या वर्षीही भव्य कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे. तसे झाले तर पुढच्या वर्षीही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द आमदार नितेश राणे यांनी कणकवलीकरांना दिला. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अबिद नाईक, विराज भोसले, अभिजीत मुसळे, शिशिर परूळेकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, राजकीय भाषण देऊन तुमच्यामध्ये आणि या कलाकारांमध्ये जास्त वेळ आम्हाला घ्यायचा नाही. पण कणकवली महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे काही आपल्यासाठी करू शकलो, जो काही भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासाठी आणू शकलो, हे फक्त आमच्या कणकवलीकरांमुळेच आहे. कारण तुम्ही आम्हाला पाच वर्ष अगोदर आशीर्वाद देऊन कणकवलीची धुरा आमच्या हातात दिलात. ते जर केला नसता तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळा इतिहास घडवला. कणकवलीकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, त्या विश्वासासाठी आम्ही सगळेजण दिवस रात्र मेहनत करू. शिंदे फडणवीस सरकारकडून अल्पावधीत तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी आमच्या कणकवलीकरांसाठी आणून दाखवलेला आहे. जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. हा उत्साह असाच दरवर्षी आपल्याला आम्ही देऊ. आपल्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आलेल्या सगळ्या कलाकारांना तसेच ज्या कार्यकर्त्यांनी अथवा ज्या लोकांनी आम्हाला हा महोत्सव घेण्यासाठी मदत केली, सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. समीर नलावडे म्हणाले, कणकवलीवासीयांनी दाखविलेला विश्वास गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादाने आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ करून दाखविला आहे. विकासाचे अनेक प्रश्न सुटू शकले याचे कारण आपला आमच्यावर असलेला विश्वास आहे. या पुढच्या काळातही हा विश्वास कायम ठेवा. कणकवलीत विकासाची गंगा आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत व राजेश कदम यांचा सन्मान करण्यात आला.
पुन्हा सत्ता द्या, भव्यदिव्य महोत्सव करू!, नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 4:26 PM