कणकवली: कणकवलीत ५ ते ८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या कणकवली पर्यटन महोत्सवाची रुपरेषा जाहीर करण्यात आली आहे. या महोत्सवात नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. महोत्सवाचे ५ जानेवारी रोजी सायंकाली ७ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर उदघाटन होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची धूम अनुभवता येणार असून रसिकांसाठी ती एक महापर्वणीच असणार आहे. या पर्यटन महोत्सवाचा समारोप ८ जानेवारी रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर महोत्सवाच्यानिमित्ताने सिने टीव्ही कलाकारांचे कार्यक्रम, फूडफेस्टिव्हल, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम यामुळे चार दिवस कणकवलीवासियांना एक मनोरंजनाची मेजवानीच मिळणार आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पटकीदेवी मंदिर ते मुख्य चौकातून महोत्सव स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच चित्ररथ स्पर्धा घेतली जाणार आहे. याचवेळी महोत्सव स्थळी फूड फेस्टिव्हलचेही उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता किडस् फॅशन शो होणार आहे. यानंतर बेधुंद धमाल कॉमेडी शो व ऑर्केस्टा होणार आहे. यामध्ये मराठीतील आघाडीचे विनोदवीर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्यामसुंदर राजपूत, चेतना भट, गायक कविता राम, अमृता नातू फेम विश्वजीत बोरगावकर यांच्या सुपरहीट कलेचा आनंद लुटता येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन ऐश्वर्या पवार करणार आहे.६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ज्येष्ठ नाट्यकर्मी सुहास वरुणकर, हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक कलाकारांचा 'कनकसंध्या कलाविष्कार' हा कार्यक्रम होणार आहे. ७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता भाई साटम आणि ५० सहकारी 'मनी आहे भाव, देवा मला पाव' हा आध्यात्मिक आणि विनोदी कार्यक्रम. सादर करणार आहेत. रात्री ८ वाजता सेलिब्रेटी कलाकारांचा जल्लोष व नृत्य, गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पार्श्वगायिका वैशाली माडे, स्वप्नील गोडबोले, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे यांच्या गायनासोबतच हेमलता बाणे, लावणीसम्राज्ञी विजया कदम यांचे नृत्य होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कलाकार दिगंबर नाईक व हेमांगी कवी करणार आहेत.महोत्सवाचा समारोप ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रात्री ८ वाजता ख्यातनाम गायक, अनेक गायन कार्यक्रमांचे परीक्षण करणारे जावेद अली यांचा 'तेरी झलक..' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे तसेच सर्व नगरपंचायत सदस्यांनी केले आहे.
कणकवली पर्यटन महोत्सवाची उद्यापासून धूम! दिग्गज कलाकारांची मांदियाळी
By सुधीर राणे | Published: January 04, 2023 4:43 PM