कणकवली : ' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात शुक्रवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता झाली. रंगपंचमी खेळताना बच्चे कंपनीबरोबरच तरुणाईचाही उत्साह दांडगा होता.
शिमगोत्सवात रंगपंचमीला खूप महत्व असते. या रंगपंचमीला धुळवड किंवा धूलिवंदन असेही म्हटले जाते. प्रत्येक गावात तेथील परंपरेनुसार विविध दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तर काही ठिकाणी पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते.
कणकवलीत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. याठिकाणी पंधरा दिवसांचा शिमगोत्सव असतो. काही घरांच्या ठिकाणीही होळीचे मांड असतात. या ठिकाणिहि परंपरागत पध्दतीने सांस्कृतिक कार्यक्रम होतात. राधा, कृष्ण, गोप यांच्या जोडीने अनेक सोंगे आणली जातात.
शहरातील काही ठिकाणी बच्चे कंपनी शुक्रवारी सकाळपासूनच रंगपंचमीचा आनंद लूटत असले तरी दुपारी १ वाजल्यानंतर साधारणतः रंगपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली. रंगपंचमीची जय्यत तयारी शहरातील तरुणाईने केलि होती.
रंग बनविण्याबरोबरच अनेक 'प्लॅन' मनोमन रचले होते. त्यांना मूर्त स्वरूप देण्यात आले. रंग पंचमीच्या पार्श्वभूमिवर विविध प्रकारचे रंग बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्याचबरोबर विविध रंगी तसेच विविध ढंगी पिचकाऱ्याही बाजारपेठेतील दुकानात दिसत होत्या. बच्चे कंपनीची रंग तसेच इतर साहित्य खरेदीसाठी सकाळी बाजारपेठेत लगबग दिसून येत होती.
कणकवली शहरात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रंगपंचमीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रथेप्रमाणे ढोल वाजल्यावर ही रंगपंचमी थांबविण्यात आली. त्यानंतर श्री रवळनाथ मंदिराजवळील गाव होळी जवळ परंपरागत पध्दतीने काही धार्मिक विधी पार पड़ल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.
शुक्रवारी शहरातील तेलीआळी , टेंबवाड़ी, बाजारपेठेसह विविध भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. तरुणाईने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. यात युवतीहि सहभागी झाल्या होत्या. चेहरे रंगवून काही तरुण शहरातून दुचाकीवरुन फेरफटका मारताना दिसत होते. रंगपंचमीच्या निमित्ताने लहान थोर सर्वानीच आनंद लुटला.
नागरिकांकडून नाराजी !
रंगपंचमीचे निमित्त करून शहरातील काही ठिकाणी रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांकडून काही तरुण पैसे मागत होते. पैसे न दिल्यास अंगावर रंग टाकण्यात येईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे याबाबत अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. किती ठिकाणी पैसे द्यायचे अशी विचारणाही करण्यात येत होती. तर या स्थितिमुळे अनेक नागरिकांनी रंगपंचमी संपेपर्यन्त घरातून बाहेर पडणे टाळले.
कणकवली शहरात शुक्रवारी तरुणाईने मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा आनंद लुटला.