कणकवली : कणकवली नगरपंचायत आरक्षित भूखंड क्रमांक २५ मधील भाजी मार्केट इमारत बांधकाम कायदेशीर आणि नियमानुसारच आहे. मात्र, कणकवलीतील अनधिकृत बांधकाम विरोधात आमदार नीतेश राणे यांची मोहिम स्वागतार्ह आहे. परंतु त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करावी, असा टोला भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी लगावला आहे.कणकवलीतील सुरु असलेले भाजी मार्केट इमारतीचे काम नियमबाह्य असल्याचा आरोप करीत आमदार नितेश राणे यांनी नागपुर येथील अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्र्यांना त्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. या निवेदनात आमदार राणे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन राजन तेली यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'क'वर्ग नगरपंचायतमध्ये आरक्षण क्षेत्रातील सुमारे १३ गुंठे क्षेत्रात १ हजार ७०० स्क्वे.फूट मोफत बांधकाम पूर्ण करून नगरपंचायतला मालकी हक्काने ताब्यात देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. याचे कौतुक करायचे सोडून राजकारणासाठी नीतेश राणे यांनी त्याला विरोध करणे चुकीचे आहे.या प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया २ वर्षे सुरू होती. या प्रकल्पाला काही व्यक्तिनी विरोध केल्यानेच त्याला विलंब झाला. या प्रकल्पाबाबत मुंबई येथील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३ बैठका झाल्या. त्यानंतर सविस्तर चौकशीनंतरच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. 500 चौरसमिटर पेक्षा इमारत बांधकाम कमी असेल तर अग्निशामक अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते. हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
आमदार नितेश राणे यांची कणकवलीतील अवैध बांधकामविरोधातील भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र , याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून करावी असेही म्हटले आहे. तसेच अजुन बरेच बोलता येईल. पण समोर पुरावे घेऊनच यापुढे आपण बोलेन,असेही त्यानी म्हटले आहे.