कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशतचा नारा देत भाजपाची वाटचाल सुरू आहे. मात्र,असे असताना भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते राजन चिके यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे .वैयक्तिक कारणामुळे तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . मात्र , त्यांच्या अचानक राजीनामा देण्याच्या कृतीबाबत आता उलट - सुलट चर्चा कणकवली तालुक्यात सुरू झाली आहे .अलीकडेच कणकवलीत माजी राज्यमंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांचा दौरा झाला . त्यानंतर राजन चिके यांच्या राजीनाम्याबाबत घडामोडी घडल्याचे बोलले जात आहे . भाजपाचे बेळणे येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले . त्यानंतर राजन चिके यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला . त्यामुळे या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण आहे की अन्य काही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .राजन चिके हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत . कठीण काळातही त्यांनी भाजपा वाढीसाठी प्रयत्न केले आहेत . फोंडाघाटमध्ये भाजपाचा बालेकिल्ला राखण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे . चिके यांची फोंडाघाट परिसरात एक व्होट बँक असल्याचे मानले जाते . फोंडाघाट सोसायटी ताब्यात ठेवण्यामध्ये ही त्यांचा मोलाचा वाटा आहे . अशा स्थितीत त्यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्काना ऊत आला आहे .कणकवली तालुका भाजपचे दोन मंडळाचे दोन तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते . त्यात फोंडाघाट , नाटळ , हरकुळ आणि कणकवली शहर या मंडळासाठी राजन चिके तर उर्वरित भागासाठी संतोष कानडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती .पक्ष श्रेष्ठी राजीनामा स्वीकारणार का ?भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या राजन चिके यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठी स्वीकारणार का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच पक्षाने राजीनामा स्वीकारल्यास तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ? याबाबत कणकवली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.
कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके यांचा राजीनामा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 2:22 PM
Kankvali, Bjp, sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशतचा नारा देत भाजपाची वाटचाल सुरू आहे. मात्र,असे असताना भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते राजन चिके यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे .
ठळक मुद्देकणकवली भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके यांचा राजीनामा !कणकवली तालुक्यात उलट - सुलट चर्चा