कणकवली : अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी मोठ्याप्रमाणात उधळपट्टी झाली असून नगरपंचायत फंडातून हा खर्च करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी संगनमताने ही उधळपट्टी केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला आहे.कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड, नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, आरोग्य सभापती अॅड. विराज भोसले, माजी नगरसेवक किशोर राणे, बंड्या गांगण आदी उपस्थित होते.यावेळी समीर नलावडे पुढे म्हणाले, 2013 साली कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी झालेल्या खर्चाच्या चौपट खर्च सन 2018 च्या निवडणुकीत करण्यात आला आहे. तसेच मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा खर्च जनतेच्या खिशातील पैशातून म्हणजेच नगरपंचायत फंडातून करण्यात आला आहे.कणकवली नगरपंचायतीच्या सन 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीचा खर्च 7 लाख 43 हजार 652 रूपये इतका होता.तर हाच खर्च 2018 साली 28 लाख 33 हजार 324 रुपये इतका झालेला आहे. केवळ मंडप आणि खुर्ची , टेबल अशा साहित्यावरच 7 लाख 84 हजार 846 रुपयांचा खर्च झाला आहे. व्हिडीओ शूटिंगसाठी 4 लाख 34 हजार 150 रूपये , स्टेशनरीसाठी 3 लाख 27 हजार 363 रूपये, चहापान तसेच अल्पोपहारसाठी 3 लाख 64 हजार 180 रूपये खर्च करण्यात आला आहे.नगरपंचायत फंडातून हा निवडणूक खर्च करण्यात आला असून कणकवलीकरांनी दिलेल्या करातून जमा झालेल्या पैशावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक प्रकारे डल्ला मारला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही याबाबत अधिकृत तक्रार करणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, 2013 साली झालेल्या निवडणुकीच्यावेळी आम्ही सत्तेत होतो. त्यामुळे त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकाऱ्याना सांगून कणकवली नगरपंचायत कार्यालय व बहुउद्देशीय सभागृहाचा वापरच निवडणुकीसाठी केला होता. त्यामुळे त्यावेळी खर्च ही कमी झाला होता. मात्र 2018 च्या या निवडणुकीत कोणालाही विचारात न घेता तहसीलदार कार्यालयाचा वापर केल्याने त्याठिकाणी काही सुविधा निर्माण कराव्या लागल्या .
परिणामी खर्चात वाढ झाली आहे. नगरपंचायतीकडे सक्षम जागा असताना ती वापरण्यात आली नाही. असे का करण्यात आले ? तसेच नवीन नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याच्या पूर्वीच या झालेल्या खर्चाची देयके संबधित व्यक्तिना अदा करण्यात आली होती. ही उधळपट्टी करताना त्यामध्ये कोणी एजंट होते का ? याचीही चौकशी जिल्हाधिकाऱ्यानी करावी अशी मागणी करणार असल्याचे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.अन्य प्रकरणेही लवकरच बाहेर काढणार !कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी खर्च करताना प्रशासनाकडून खूप उधळपट्टी करण्यात आली आहे. अशी अन्य काही प्रकरणे असून तीही लवकरच बाहेर काढणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.