सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग १६६ जी वरील मौजे तळेरे ता. कणकवली पासून करुळ घाट, ता. वैभववाडी - गगनबावडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक ३ आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
करुळ घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या घाटात सुरू असेलल्या जड वाहतुकीमुळे भरलेले खड्डे वारंवार उखडले जात असल्याने काम वेळेत होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. करुळ घाटातून होणारी वाहतूक पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. १) कोल्हापूर वरुन येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग १६६- जी कडे. २) गोवा वरुन कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्ठ्यावरून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असेही या आदेशात म्हटले आहे.