प्रकाश काळेवैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी करुळ घाटमार्ग बंद करून तब्बल आठ महिने झाले; परंतु तीन-चार महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा असलेल्या या घाटातील रुंदीकरण व काँक्रीटीकरण अजून अर्धवट आहे. याकडे जिल्हा प्रशासन, महामार्ग प्राधिकरण किंवा लोकप्रतिनिधी यांपैकी कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. परिणामी भुईबावडा घाटमार्गे सुरू असलेली वाहतूक म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे ‘एसटी’च्या दोन अपघातांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे आणखी किती महिने हा जीवघेणा खेळ खेळला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या नाधवडे ते कोकिसरे व करुळ ते गगनबावडा या दोन भागांतील कामाला गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला करुळ घाटमार्गाचे काँक्रीटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी २२ जानेवारीपासून या घाटमार्गाची वाहतूक सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर ३१ मे व पुन्हा ३० जूनपर्यंत कालावधी वाढविला; परंतु ठेकेदार कंपनीने प्रशासनाचा पुरता अपेक्षाभंग केला. अजूनही किती कालावधी जाईल हे सांगता येणार नाही. कारण जिल्हा प्रशासन, महामार्ग प्राधिकरण किंवा लोकप्रतिनिधी यापैकी कोणाचे याकडे फारसे लक्ष नसल्याने ठेकेदार आपल्या सोयीनुसार काम करीत आहे. सर्वांचा हा निष्काळजीपणा लोकांच्या जीवावर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.ठेकेदाराची अपुरी यंत्रणा, नियोजनाचा अभाव, आणि घाटरस्त्याच्या बांधकामाचा तोकडा अनुभव. जे करायला नको होते तेच सर्वांत आधी करण्यावर ठेकेदाराने भर दिला. त्याकडे महामार्ग प्राधिकरण केवळ पाहत राहिले. यामुळे दुपदरीकरणाच्या कामात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यांचे नेमके उदाहरणच द्यायचे झाले तर नाधवडे ते कोकिसरेदरम्यान एका मार्गिकेचे काही अंशी काम पूर्ण झाले. दुसरी मार्गिका पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नाही. हे स्पष्टपणे दिसत असतानासुद्धा ती खोदून बंद करुन टाकली. परिणामी तळेरे वैभववाडीदरम्यान वाहतूककोंडी, बाजूपट्टीवर वाहने रुतून बसणे आणि छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत; परंतु ठेकेदारापुढे महामार्ग प्राधिकरण काहीसे हतबल झालेले दिसले.
एसटीच्या अपघातून १०० जीव बालंबाल वाचलेजेमतेम चार महिने जातील या अंदाजाने बंद केलेला करुळ घाटमार्ग अपूर्ण कामामुळे आठ महिने उलटून गेले तरी बंदच आहे. त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीचा संपूर्ण भार भुईबावडा घाटमार्गावर आहे. या घाटाने पावसाळ्यात खूपच चांगली साथ दिली; परंतु वैभववाडी उंबर्डेमार्गे भुईबावडा हा मार्ग काही ठिकाणी अरुंद आहे. त्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यावर मोठी पंचाईत होत आहे. अशाच प्रकारे दुचाकीला वाचवताना कुसूरमध्ये ओढ्यात आणि ट्रकला बाजू देताना भुईबावडा घाटाच्या पायथ्याशी रिंगेवाडी येथे एसटी बस मळ्यात कोसळली. त्यातील एका बसमध्ये ३३ व दुसऱ्या बसमधून ६५ लोकं प्रवास करीत होते. या दोन्ही अपघातांतून केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक वाहकांसह १०० हून अधिक जणांचा जीव थोडक्यात वाचला; पण या अपघातांना जबाबदार कोण? हा प्रश्न उरतोच!
करुळ घाटाने वाहतूक सुरु होणे गरजेचेच!गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने वाहतुकीची फारशी काळजी घेतली नाहीच; परंतु आगामी काळात दसरा, दिवाळी, नाताळ हे सण असल्याने शिवाय पर्यटन हंगामाला सुरुवात होणार असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे काहीही करून करुळ घाटमार्ग वाहतुकीस खुला करण्याचे शिवधनुष्य महामार्ग प्राधिकरणाला पेलवावेच लागेल.सध्या घाटमार्गाचे तीन किलोमीटर काम शिल्लक असून नुकतीच त्याला सुरुवात केली आहे. ते रात्रंदिवस युद्धपातळीवर करून महिनाभरात घाटमार्ग वाहतुकीस खुला करण्याचा रेटा प्राधिकरणाने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय अपघातांची मालिका थांबून प्रवास सुरक्षित होणार नाही.
करुळ घाटातील शिल्लक असलेले अडीच-तीन किलोमीटर काँक्रीटीकरणाचे काम नुकतेच सुरु केले आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडींची पडझड झाल्यामुळे केलेल्या कामांचेही बरेच नुकसान झाले आहे. त्याचीही दुरुस्ती करावी लागणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी अहवाल मागितला होता. त्या अनुषंगाने ठेकेदाराकडून आम्ही लिखित स्वरुपात घेतले आहे. ठेकेदाराने १५ जानेवारी २०२५ ची मुदत दिली आहे. तसा अहवाल आम्ही जिल्हाधिकारी यांना दिला आहे; मात्र डिसेंबरअखेरपर्यंत करुळ घाटमार्ग वाहतुकीस खुला करण्याचे महामार्ग प्राधिकरणामार्फत प्रयत्न सुरु आहेत. - अतुल शिवनिवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण