नांदगाव : कासार्डे येथे होऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. २२ जुलैपासून या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेची संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख विभाग कणकवलीमार्फत भूसंपादन मोजणीच्या नोटीसा देण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी सोमवारी गेले होते. मात्र कासार्डेसह पाच महसुली गावामधील एकाही ग्रामस्थाने नोटीस स्विकारली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले.कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पासाठी महसूल विभागामार्फत कासार्डेसह जांभूळगाव, दाबगाव, उत्तर दक्षिण गावठण आणि नागसावंतवाडी या पाच महसुली गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र या गावांतील ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वी काहीकाळ थांबविण्यात आली होती. मात्र पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून १० हजार खातेदारांना नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कासार्डे महसुली गावातील खातेदारांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. १७०० हेक्टरमधील खातेदारांना या नोटीसा देण्यात येणार आहेत. एमआयडीसीसाठीची संयुक्त मोजणी महसूल, भूमिअभिलेख व महामंडळाचे अधिकारी यांच्या संयुक्त उपस्थितीत २२ जुलैपासून सुरू केली जाणार असल्याचे समजते. मात्र या एमआयडीसीच्या प्रकल्पाला विरोध असल्याने ग्रामस्थांनी सोमवारी नोटीसा स्विकारल्या नाहीत. (वार्ताहर)
कासार्डे ग्रामस्थांनी नोटीसा नाकारल्या
By admin | Published: July 08, 2014 12:29 AM