कणकवली : कणकवली नगराध्यक्ष पदासाठी सध्या रस्सीखेच सुरु असून काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येच दोन गट पडले आहेत. काँग्रेसकडून सुविधा साटम तर संदेश पारकर गटाकडून माधुरी गायकवाड़ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही गटांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून राजकीय डावपेचांना वेग आला आहे. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार याबाबत आता नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.कणकवली नगराध्यक्ष पदाचा अडीच वषार्चा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याच बरोबर उपनगराध्यक्ष निवड ही होणार आहे. मात्र पूर्वीचे सहकारी असलेले आणि आता एकमेकात वितुष्ट आलेले संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही गटाकडून आपला नगराध्यक्ष बसावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु आहे. काँग्रेस विरुद्ध संदेश पारकर गट असे काहीसे वातावरण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाले आहे.३ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पासूनच विविध घटना घडत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार ठरविण्यापासून दोन्ही गट एकमेकांशी रस्सीखेच करीत असल्याचे दिसून येत आहे. या संघर्षातूनच नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गटांनी आपले वेगवेगळे उमेदवार उभे केले. तर आपल्याला विश्वासात न घेतल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपण तटस्थ राहणार असल्याचे विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी पारकर गटाकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राजश्री धुमाळे यांचे समर्थन जरी पारकर गटाला मिळाले तरी शिवसेनेचे तीन नगरसेवक मिळून फक्त आठच सदस्य त्यांच्याकडे होणार आहेत. बहुमतासाठी त्यांना आणखीन एका नगरसेवकाच्या समर्थनाची गरज भासणार आहे. त्यामुळे तो नेमका नगरसेवक कोण असेल याबाबतही शहरातील नागरिकांकडून तर्कवितर्क करण्यात येत आहेत.काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करण्यात येणार ? किवा विद्यमान नगरसेवक समीर नलावडे यानाच पुन्हा संधी दिली जाणार का? याबाबतही नागरिकांकडून आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे. (वार्ताहर)...तर निवडणूक अटळआता ७ आॅक्टोबर रोजी या दोन अर्जांपैकी एक अर्ज मागे घेतला गेला नाही तर ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक अटळ आहे. त्यामुळे १७ नगरसेवकांमधुन ९ नगरसेवकांचे बहुमत मिळविण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु आहेत. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यामुळे निवडीकडे लक्ष लागले आहे.
कौन बनेगा कणकवली ‘नगराध्यक्ष’
By admin | Published: October 05, 2015 9:54 PM