देवगड : देवगड शहरामध्ये आढळत असलेले कावीळीचे रूग्ण हे दुषित पाणीपुरवठ्यामुळे असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
देवगड सडा, देवगड विठ्ठलवाडी व तारामुंबरी या भागात काविळीचे रूग्ण आढळल्यानंतर तातडीने आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले. यामध्ये ज्या भागात देवगड नगरपंचायत पाणीपुरवठा करते त्या भागात हे रूग्ण सापडत असल्याने कावीळ ही या पाण्यातून पसरली आहे.देवगड भागात ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज असून त्यातून मैलामिश्रीत पाणी आत गेल्यामुळे पाणीपुरवठ्याचे पाणी दुषित होत आहे. यामुळेच हा कावीळीचा आजार पसरत आहे.दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी देवगड तारामुंबरी परिसरात कावीळीचे एकूण ६ रूग्ण सर्वेक्षणात निष्पन्न झाल्याची माहिती दिली.
आपण स्वत: तारामुंबरी येथे पाहणी केली. यावेळी या भागात ४ रूग्ण आढळले असून यापैकी दोघांच्या प्रकृतीत पूर्णत: सुधारणा झाली असल्याचे सांगितले.तारामुंबरी भागात पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाईपलाईनला तीन ठिकाणी लिकेज होती. नगरपंचायतीने ही लिकेजस काढली असून ज्या ठिकाणी लिकेजस होती त्या ठिकाणी शौचालय असल्याने दुषित पाण्यामुळेच कावीळ आजार झाल्याचे डॉ.कोंडके यांनी सांगितले.विहिरींमध्ये पाण्याचे शुद्धीकरण : कोंडकेनागरिकांना पाणी गाळून, उकळून प्यावे अशा सूचना देण्यात आल्या असून पाणीशुध्दीकरण मोहिम नगरपंचायतमार्फत करण्यात आली आहे. सार्वजनिक व वैयक्तिक विहीरींमध्येही टीसीएल पावडर टाकून पाणी शुध्दीकरण करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ.कोंडके यांनी दिली.