मिठबांव : मिठबांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिठबांव ग्रामपंचायतीमार्फत टाळे ठोकण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने रूग्णांची होणारी परवड व गैरसोय याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत ग्रामपंचायत मिठबांवमार्फत ग्रामस्थांच्या उपस्थितीत टाळे ठोकण्यात आले. यावेळी सरपंच रेखा जेठे, पंचायत समिती सदस्य डॉ. मनोज सारंग, उपसरपंच अरविंद लोके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश जोईल, ग्रामपंचायत सदस्य महादेव नरे, जयकुमार नारिंग्रेकर, संदीप खेडेकर, मधुसुदन पारकर व ग्रामस्थ हजर होते.एप्रिल महिन्यात मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्र विंधन विहिरीवरील पाणी पुरवठा पंपावर वीज कोसळून पूर्ण वसाहतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा चालू न करता फक्त आश्वासने दिली जात आहेत. स्वाभाविक कर्मचारी पाणी विकत घेणे किंवा वसाहत सोडून इतरत्र राहणे पसंत करतात. तसेच याठिकाणचे प्राथमिक आरोग्य अधिकारी एन. एस. गोखले ३० मेपासून दीर्घ सुट्टीवर आहेत. या सर्वांचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो.या सर्व संतापाचा आज उद्रेक होऊन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमार्फत घेराव घालून प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्यात आले. इळये प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांशी संपर्कानंतर शनिवारी ९ वाजेपर्यंत डॉक्टर हजर करण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्या डॉक्टरनी ग्रामपंचायत कार्यालयातून चावी नेऊन कायमस्वरूपी सेवा द्यावी, अशी अट ग्रामपंचायतीमार्फत घातली आहे. सुमारे एक महिन्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मिठबाव विंधन विहिरीवर पंप मंजूर होऊनही काम पूर्ण करण्यास टाळाटाळ होत असल्याने कर्मचाऱ्यांनीही यावेळी तीव्र नापसंती व्यक्त केली. (वार्ताहर)
आरोग्य केंद्राला ठोकले टाळे
By admin | Published: June 07, 2014 12:31 AM